महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांच्याकडून महापौरांचा वारंवार अपमान होत असल्याचा विषय सर्वसाधारण सभेत सोमवारी अनेक सदस्यांनी उपस्थित केला. संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणीही सभेत करण्यात आली.
काँग्रेसच्या कमल व्यवहारे तसेच संजय बालगुडे, बंडू केमसे, वसंत मोरे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी हा मुद्दा सभेत उपस्थित केला. अग्निशमन दलातर्फे २० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या अग्निशमन दिनाच्या कार्यक्रमात महापौर वैशाली बनकर यांच्यासह सदस्यांना का आमंत्रित करण्यात आले नव्हते, असा प्रश्न व्यवहारे यांनी या वेळी विचारला. महापौरांनी या प्रकाराबाबत तीव्र भावना व्यक्त करणारे पत्र आयुक्तांना दिले असून गेल्यावर्षी या कार्यक्रमात आमंत्रित करून महापौरांचा अपमान करण्यात आला होता, अशी तक्रार बालगुडे यांनी केली. गेल्यावर्षी या कार्यक्रमात महापौर उपस्थित असूनही त्यांच्या हस्ते ध्वजवंदन न करता ते दलप्रमुख रणपिसे यांनी केले, तर यंदा महापौरांना आमंत्रणच दिले गेले नाही. प्रशासन कशा पद्धतीने चालले आहे, हेच यावरून दिसते, असे बालगुडे म्हणाले.
काही अधिकाऱ्यांकडून असभ्य वर्तन
या विषयाच्या अनुषंगाने अन्यही काही अधिकाऱ्यांबाबत सदस्यांनी गंभीर तक्रारी केल्या. एका उपायुक्तांबाबत महिलांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. त्याबाबत सर्व पक्षनेते सभागृहनेत्याच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेटले होते. तरीही त्यांनी केलेल्या कारवाईच्या मागणीची दखल आयुक्तांनी घेतलेली नाही. तर, दुसऱ्या एका क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या विरोधातही महिला अधिकाऱ्याने तक्रार दिली आहे तरीही कारवाई झालेली नाही, असे मुद्दे या वेळी मांडण्यात आले.
पालिका सुरक्षा प्रमुखाला
वर्तन सुधारण्याची समज
महापालिकेचे सुरक्षा अधिकारी संतोष पवार यांच्या विरोधातही सभेत अनेक सदस्यांनी तक्रारी केल्या. त्यांच्या विरोधात पंधरा नगरसेवक अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांना भेटले होते आणि त्यांनी पवार यांच्या गैरवर्तनाचे अनेक पुरावे देऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. पवार यांच्यासंबंधी अनेक कर्मचाऱ्यांकडूनही तक्रारी झाल्या आहेत. पवार नगरसेवकांच्या अंगावर धावून गेले होते. त्याबाबतही तक्रारी झाल्या होत्या तरीही कारवाई का होत नाही, असा प्रश्न सभेत विचारण्यात आल्यानंतर पवार यांना वर्तन सुधारण्याबाबत लेखी समज देण्यात आली आहे, असे आयुक्तांनी सांगितले.