पुणे : जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या परीक्षेच्या ऑनलाइन अर्जासह जात प्रमाणपत्र जोडण्याच्या अटीमुळे अनेक पालकांना अडचणी येत होत्या. मात्र, आता जात प्रमाणपत्र जोडण्याची अट काढून टाकण्यात आली आहे.

जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्र शासनाकडून चालवली जाणारी शाळा आहे. जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न असलेली निवासी शाळा आहे. या शाळेतील प्रवेशासाठी सीबीएसईमार्फत प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते. पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. सहशिक्षण पद्धतीने (को.एड.) सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण या शाळेत दिले जाते. त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा प्रवेश परीक्षा देण्याकडे अधिक कल दिसून येतो. शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठीही प्रवेश परीक्षा १३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ जुलै आहे. मात्र, नवोदय विद्यालय समितीने यंदाच्या ऑनलाइन अर्जात इतर मागास वर्ग (ओबीसी) जात प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक केले होते. मात्र, अनेक पालकांकडे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे संकेतस्थळावर बदल करण्यात आला असून, जात प्रमाणपत्र जोडण्याची अट काढून टाकण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य बी. आर. खेडकर म्हणाले, ऑनलाइन अर्जात जात प्रमाणपत्र जोडावे लागत होते. मात्र, पालकांकडे जात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने, प्रमाणपत्र मिळण्यास वेळ लागत असल्याने अनेक पालकांना अर्ज भरता येत नसल्याची बाब निदर्शनास आली. आता जात प्रमाणपत्र जोडण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक पालकांना प्रवेश परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरणे शक्य होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशभरात ६००हून अधिक विद्यालये

 प्रत्येक जिल्ह्यात एक या प्रमाणे देशभरात ६००हून अधिक जवाहर नवोदय विद्यालये आहेत. त्यानुसार सर्वाधिक विद्यालये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान अशा राज्यांमध्ये आहेत. तर महाराष्ट्रात ३०हून अधिक जवाहर नवोदय विद्यालये आहेत.