वर्षभरापासून सर्व वैज्ञानिक उपक्रम बंद; साहसी उद्यानाचीही दुरवस्था
बालचमूंसाठी औत्सुक्याचा विषय आणि आनंदाचा ठेवा असलेले पेशवे उद्यान भकास झाले आहे. निविदेअभावी उद्यानातील सर्व वैज्ञानिक उपक्रम बंद आहेत. तसेच बहुतांशी साहसी खेळही दुरवस्थेमुळे बंद आहेत. शहरातील मध्यवर्ती भागात असलेले पेशवे उद्यान अक्षरश: ओस पडले असून गेल्या वर्षभरात महापालिका आणि उद्यान विभागाकडून येथील ऊर्जा उद्यान तसेच साहसी खेळ उद्यान चांगल्या प्रकारे सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुट्टीच्या काळात पेशवे उद्यानामध्ये पुण्यासह राज्यभरातून पर्यटक गर्दी करतात. सध्या शाळांच्या परीक्षा सुरू असून येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी सुरू होईल. उन्हाळ्याच्या सुट्टीत बालगोपाळांची उद्यानात गर्दी होते. उद्यानातील सौर नि:क्षारीकरण संयत्र, सौर उष्ण जलयंत्र, बायोगॅस, जैविक ऊर्जा दालन, पवन ऊर्जा दालन, जल दालन, माहिती दालन, सौर दालन असे विविध वैज्ञानिक उपक्रम केवळ निविदेअभावी बंद आहेत. तसेच उद्यानातील कारंजेही बंद आहे. उद्यानातील बागेत सध्या बांधकाम आणि रंगकाम सुरू असून त्या कामाचे साहित्य उद्यानात सर्वत्र दिसत आहे. उद्यानात सर्वत्र राडारोडा टाकण्यात आलेला आहे. बांधकामासाठी लागणारी खडी, वाळू, पोती यांचे सर्वत्र ढिग पसरले आहेत. वैज्ञानिक दालन बंद असून त्याच्या पाठीमागे उद्यानातील जुने फलक, लोखंडी अँगल, टायर असे साहित्य पडले आहे. बागेतील बाकांचीही दुरवस्था झाली आहे.
उद्यानाच्या या दुरवस्थेमुळे बाहेरगावाहून मोठय़ा उत्साहाने पेशवे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांची साफ निराशा होत आहे. उद्यानातील साहसी खेळांच्या प्रकल्पाचे उद्घाटन २५ डिसेंबर २०११ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. सुरुवातीच्या काही काळात साहसी खेळ आणि वैज्ञानिक उपक्रमांमुळे उद्यानाच्या वैभवात भर पडली. पर्यटकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. मात्र, यथावकाश उद्यान बकाल झाले. येथे बारा महिला सुरक्षारक्षक तर फाटकावर दिवस आणि रात्रपाळीमध्ये दोन पुरुष सुरक्षारक्षक तैनात असतात. मात्र साहसी खेळांचा विभागच बंद असल्यामुळे तेथे फारसे कोणी जात नाही. खेळांचा विभाग चालवण्यासंबंधीची निविदा संपल्याने उद्यानातील लहान मुलांचे किरकोळ खेळ सोडले तर सर्व खेळ बंद आहेत असे सांगण्यात आले.
उद्यानातील वैज्ञानिक खेळ ‘म्हाडा’ने बसविले आहेत. वैज्ञानिक खेळातील काही सुटे भाग त्यांच्याकडून उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आवश्यक दुरुस्ती करुन देण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती. उद्यानातील प्रशिक्षकांची मुदत संपली असल्यास त्यांना पालिकेकडून मुदतवाढ देण्यात येते. कामगार निविदांसाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन आर्थिक वर्षांत हे सुरू होईल.
–अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक