गंगाधाम चौक परिसरातील आनंदनगर झोपडपट्टीवासियांवर अत्याचार करून झोपड्या खाली करण्यास प्रवृत्त करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर आणि मनोज देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, सचिन आडेकर यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>> पुणे : लोहगांव, विमाननगर परिसराचा पाणीपुरवठा रविवारी बंद
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना यासंदर्भातील चित्रफित दाखविण्यात आली. आमदार, नगरसेवक आणि माजी नगरसेविकेचा पती यांच्यासमेवत अट्टल गुन्हेगार या कारवाईमध्ये सहभागी झाले होते, ही बाब यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली.आनंदनगर वसाहत येथे चोवीस तास पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. अनाधिकृत इमारतीत झालेल्या सक्तीच्या पुनर्वसनाबाबत संबंधितांवर चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.