जेजुरी : पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आणि काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष संजय जगताप हे भाजपच्या वाटेवर असून, लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. जगताप हे भाजपमध्ये गेल्यास जिल्ह्यात काँग्रेसचा धक्का बसणार आहे.
विधानसभा निवडणुकीत आमदार विजय शिवतारे यांच्याकडून जगताप यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीतील पक्षांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने त्यांच्यावर पराभवाची नामुष्की आली. आता ते भाजपच्या वाटेवर आहेत.
पुरंदर तालुक्यात संजय जगताप यांचे वडील दिवंगत आमदार चंदुकाका जगताप यांनी काँग्रेस रुजविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी गावोगावी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ दिले. संजय जगताप यांनी हा वारसा कायम ठेवला. सासवड नगरपालिका, जेजुरी नगरपालिका, विकास सोसायट्या, ग्रामपंचायती, दूध संघ, निरा बाजार समिती, खरेदी-विक्री संघ यांच्यावर काँग्रेस आणि जगताप कुटुंबाचे वर्चस्व कायम राहिले आहे. आता जगताप हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याने काँग्रेसला धक्का बसणार आहे.
शिवतारेंपुढे आव्हान
पुरंदर विधानसभा मतदारसंघात २००९ आणि २०१४ या सलग दोन निवडणुकांमध्ये विजय शिवतारे निवडून आले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत संजय जगताप यांंनी त्यांचा पराभव केला. २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने संभाजी झेंडे यांना उमेदवारी दिली. झेेंडे यांनी ४७ हजार मते घेतल्याने मतांच्या विभाजनाचा फटका जगताप यांना बसला. शिवसेनेेचे (शिंदे) शिवतारे हे विजयी झाले. आता जगताप भाजपमध्ये गेल्यास शिवतारे यांच्यापुढे महायुतीतील मित्रपक्षाचेच आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
भाजपचे बळ वाढणार
माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास पुरंदर तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. जगताप यांचे तालुक्यात मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. जगताप भाजपवासी झाल्यास काँग्रेसला फटका बसून, भाजपचे बळ वाढणार आहे. त्याचा परिणाम सासवड आणि जेजुरी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.