पिंपरी : ‘वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चिघळत असताना दोन-तीन दिवस महिला आयोगाने त्यात लक्ष घातल्याचे दिसले नाही. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून त्यांनी पुढे यायला पाहिजे होते. या प्रकरणात लक्ष घालून न्याय देण्याची भूमिका स्वीकारायला पाहिजे होती. मात्र, दुर्दैवाने ती आम्हाला दिसली नाही. हे राज्याचे, महिलांचे दुर्दैव आहे,’ अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी केली.

वडेट्टीवार यांनी वाकड येथे वैष्णवी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘या प्रकरणाची संपूर्ण माहिती कुटुंबाकडून घेतली. क्रूर मारहाणीची सर्व छायाचित्रे पाहिली. ज्या पद्धतीने वैष्णवी यांना मारहाण झाली, ते पाहता हगवणे कुटुंब राक्षस आहेत. मानवतेला काळीमा फासणारे कृत्य त्या नालायक कुटुंबाने केले आहे. नऊ महिन्यांचे बाळ असताना कोणीही आत्महत्या करू शकत नाही. तिला मारून तिचा जीव घेतला आहे. पोलिसांचा तपासही त्या दिशेने झाला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत हगवणे कुटुंबासारख्या राक्षसी प्रवृत्तीला माफ करता कामा नये. त्यांना चौकात आणून फाशी दिली पाहिजे. ते फाशी देण्याच्याच लायकीचे आहेत. कोणत्याही पक्षाचा माणूस असेल, तर अशा प्रवृत्तीला ठेचले पाहिजे. या प्रकरणात ज्याच्याकडे हे बाळ होते तो आरोपी नीलेश चव्हाण फरार आहे. पोलिसांना तो का सापडत नाही?’

‘महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात महाराष्ट्र सगळ्या राज्यांच्या पुढे गेला आहे. गेल्या पाच वर्षांत ६६ हजार महिला बेपत्ता आहेत. दर दोन तास तेरा मिनिटांनी एका महिलेचा खून होतो किंवा तिच्यावर अत्याचार होतो. ही सगळी परिस्थिती बघता राज्यात कायद्याचा धाक दिसत नाही. कायद्याचा बडगा कठोरपणे का उगारला जात नाही? महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे,’ असेही वडेट्टीवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सुपेकरांवरही कारवाई करा’

पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचे नाव या प्रकरणात जोडले जात असल्याबद्दल विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘मी ध्वनिमुद्रित संभाषण (कॉल रेकॉर्डिंग) ऐकले आहे. यात त्यांचा पक्षपातीपणा दिसतो. ते यात सहभागी आहेत, असे नाही, पण एक पोलीस अधिकारी म्हणून त्यांची भूमिका नि:पक्षपाती नाही. ती एखाद्याच्या बाजूने दिसते. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.’