युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशाने भाजपने अशोभनिय फलक लावले, असा आरोप काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी पुण्यात केला. काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण करण्यासाठी भाजपची ही खेळी आहे, असे बागवे यांनी म्हटले आहे. ‘तूच आहेस पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार’ असे शीर्षक देऊन विश्वजित कदम यांना सांगलीला जाण्याचा सल्ला देणारे फलक पुण्यात लागले होते. या फलकबाजीच्या विरोधात काँग्रेसने सोमवारी निषेध व्यक्त केला.

‘डॉ. विश्वजित कदम हे राज्यातील युवक काँग्रेसचे दोनवेळा निवडून आलेले अध्यक्ष आहेत. गेल्या १५ वर्षांपासून ते पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी युवकांसोबत कार्यरत आहेत. त्यांच्यावर काँग्रेसपक्षाला पूर्णपणे विश्वास आहे’, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या रणनितीप्रमाणे विश्वजित कदम मैदानात उतरले. त्यांनी पावणे तीन लाख मतंदेखील मिळवली. या निवडणुकीतील पराभवाने हताश न होता त्याच जोमाने त्यांनी विधानसभेचे काम केले. यातून त्यांनी पक्षाबाबत असणारी निष्ठा सिद्ध होते. पण त्यांना बदनाम करण्याच्या हेतून विरोधकांनीच विकृत कृत्य केल्याचा आरोप काँग्रेसकडून यावेळी करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच विश्वजित कदम आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. तेव्हापासून विश्वजित कदम हे सार्वजनिक कार्यक्रम टाळताना दिसत आहेत.

या देखील पत्रकार परिषदेला ते हजर राहणार असल्याची चर्चा होती. मात्र ते या पत्रकार परिषदेला आलेच नाहीत.  ‘तूच आहेस पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार’ या शीर्षकाखाली विश्वजीत यांच्या फलकावर काही नावे देखील लिहिण्यात आली होती. ही नावे चुकीची होती, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. याशिवाय फलकबाजी करुन विनाकारण नाव बदनाम करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती देखील बागवे यांनी यावेळी दिली. विश्वजित कदम हे मुळचे सांगलीचे असले तरी पुणे ही त्यांची कर्मभूमी आहे. काँग्रेसपक्षाचा त्यांचा नेहमीच पाठिशी राहील, असे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले.