गेले काही दिवस नीतेश अस्वस्थ होता. आर्थिक ओढाताण, कार्यालयीन समस्या यांच्यामुळे तो अगदी पिचला होता. एका चौकोनी कुटुंबात वाढलेल्या नीतेशला मित्रही फारसे नव्हते. खरे तर मित्र हे केवळ कामापुरतेच असतात, असा त्याचा समज असल्यामुळे सगळ्यांशी तो जेवढ्यास तेवढे संबंध ठेवून होता. अनेकदा त्याचे सहकारी किंवा इतर मंडळी आपापले दुःख नीतेशला सांगायचे. तो त्यांना उत्तम सल्ला देण्याबरोबरच दुसऱ्याचे दुःख दूर करण्यासाठी प्रयत्नशील असायचा. इतकं सगळं असताना त्याच्या स्वत:च्या मनातील किंतु, परंतु भावनांमुळे, तसेच दुसऱ्यावरच्या अविश्वासामुळे त्याचे ऐकायला योग्य कान कधी मिळालाच नाही.
ऋताची कथा काहीशी वेगळी होती. तिला खूप साऱ्या मैत्रिणी असल्या, तरी प्रत्येकालाच ती आपले दुःख ऐकवत राहायची. त्याला कंटाळून तिच्या मैत्रिणी हळूहळू तिच्यापासून दूर व्हायला लागल्या. त्यामुळे नीतेश काय किंवा ऋता काय; दोघांना आयुष्यात एकटे पडण्याची वेळ आली होती.
‘अति तेथे माती’ होऊ नये म्हणून संतुलित वागण्या-बोलण्याची गरज असते. मित्र-मैत्रिणींना त्यांची ‘स्पेस’ देत असताना, स्वतःसाठीदेखील एक वेगळा अवकाश स्पेस निर्माण करण्याची गरज असते.
आयुष्यात ऐकणारी मंडळी कितीही असली, तरीही कान देणारी मंडळी तशी कमीच असतात. नुसते ऐकणे आणि लक्षपूर्वक ऐकणे, सांगणाऱ्याची परिस्थिती समजून घेणे आवश्यक असते. असे लक्षपूर्वक ऐकण्यासाठी योग्य कान आणि नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेऊ पाहणाऱ्या त्या व्यक्तीला त्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी वीस वर्षे सातत्याने कार्य करणाऱ्या ‘कनेक्टिंग ट्रस्ट’चा आज वर्धापनदिन. अर्णवाज दमानिया यांनी २००५ मध्ये ‘कनेक्टिंग ट्रस्ट’ची पुण्यात सुरुवात केली. दि. २३ ऑगस्ट २००५ हा संस्थेचा स्थापना दिन. ‘माइंडफुलनेस बेस्ड ॲक्टिव्ह लिसनिंग’ हे ‘कनेक्टिंग’च्या कामाचे मूळ तत्त्व आहे. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न बाळगता, अनावश्यक सल्ला न देता आणि गोपनीयतेचे पालन करत मानसिक-भावनिक आधार देण्याचे काम ही संस्था करत आहे.
कोणाच्या मनात काही साचून राहिले असेल आणि ऐकायला कोणी नसेल, नैराश्याचे काळे ढग दाटले असतील; तर ते दूर व्हावेत अशी इच्छा असणारे कोणीही ९९२२००४३०५ अथवा ९९२२००११२२ यांपैकी कोणत्याही एका हेल्पलाइन क्रमांकावर सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत संपर्क साधू शकतात. आत्महत्या प्रतिबंध या एकाच, पण महत्त्वाच्या विषयात संस्था कार्यरत आहे. ज्या व्यक्तींना मानसिक-भावनिक आधाराची गरज भासते, ज्यांच्या मनात आत्महत्येची भावना निर्माण होत असते, ज्यांनी स्वत: यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे किंवा ज्यांच्या घरी आत्महत्येने कोणी दगावले आहे; थोडक्यात, ज्यांनी आत्महत्येची भावना अथवा प्रसंग अगदी जवळून अनुभवला आहे, अशा व्यक्तींशी बोलून ‘कनेक्टिंग’चे प्रशिक्षित स्वयंसेवक त्यांना मानसिक व भावनिक आधार देण्याचा प्रयत्न करतात. ट्रस्टमार्फत ‘डिस्ट्रेस हेल्पलाइन’, ‘सुइसाइड सर्व्हायव्हर सपोर्ट’, ‘पीअर एज्युकेटर्स’, तसेच ‘स्टुडंट मेंटल हेल्थ प्रोग्राम’ आणि ‘अवेअरनेस प्रोग्राम’ असे एकूण चार प्रकल्प चालवले जातात.
‘डिस्ट्रेस हेल्पलाइन’वर दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत, तर शुक्रवारी आणि शनिवारी दुपारी ३.१५ ते ५.३० या वेळेत ट्रस्टचे काम चालते. तेथे प्रत्यक्ष जाऊन, ई-मेलद्वारे, तसेच हेल्पलाइनच्या मदतीने आधार देण्याचे कार्य करण्यात येते. सोमवारी आणि बुधवारी दुपारी २ ते ५ या वेळेत प्रत्यक्ष भेटीत समुपदेशनाद्वारेही काम केले जाते. याशिवाय जनजागृती कार्यक्रमांतर्गत ‘भावनिक साक्षरता’, ‘मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंध’ या मुद्द्यांवर सत्रे घेतली जातात. प्रश्नोत्तरे धरून साधारणपणे एक तास या सत्राला लागू शकतो. पीअर एज्युकेटर्स आणि स्टुडंट्स मेंटल हेल्थ प्रोग्रामद्वारा विद्यार्थ्यांमध्ये आपापसातील भावनिक ताण ओळखणे, त्या विषयी मदत कशी मिळवता येईल ते पाहणे आणि त्यायोगे आत्महत्या रोखणे हे सर्व कार्यक्रम विनामूल्य राबवले जातात.
shriram.oak@expressindia.com