Sharad Pawar on Chief Minister : महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच मुख्यमंत्रीपदामध्ये रस नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथे शुक्रवारी मांडली. जनतेला सक्षम पर्याय हवा आहे आणि आम्हाला परिवर्तन हवे आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर आधी निवडणूक नंतर मुख्यमंत्रीपदाचा विचार, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतची भूमिका मांडली.
‘मुख्यमंत्री कोण असेल, हा माझ्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी पक्षात कोणीही इच्छुक नाही. कोणालाही मुख्यमंत्री होण्यात रस नाही. राज्यात आम्हाला सुशासन द्यायचे आहे. त्यासाठी सरकारमध्ये बदल हवा आहे. जनतेला पर्याय हवा आहे आणि आम्हाला परिवर्तन हवे आहे. त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार किंवा कोण होणार नाही, हे महत्त्वाचे नाही,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, या प्रकाराबाबत सतर्क राहून भूमिका घेतली पाहिजे. बालिका आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यासंदर्भात दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. राज्याच्या गृहखात्याने यासंदर्भात ठोस कार्यवाही करणे आवश्यक आहे.
अत्याचारांच्या वाढत्या घटनांसंदर्भात जनतेच्या मनात रोष आहे. त्याविरोधात संघर्षाची भूमिका घेण्याऐवजी शनिवारी (२४ ऑगस्ट) एक दिवसाचा बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलींच्या सुरक्षतितेसाठी जनता एकत्र येईल, असे शरद पवार यांनी सांगितले.