पुणे : कसबा पोटनिवडणुकीत विजय मिळविलेले रवींद्र धंगेकर यांच्या विजयात ठाकरे गटाचा मोठा हातभार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रचार केल्याने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अप्रत्यक्ष मदत केल्याने रासने यांना मोठ्या फरकाने विजय मिळविता आल्याचेही दिसत आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष तीव्र झाला आहे. काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा राहील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. कसब्यात ठाकरे गटाची मोठी ताकद आहे. मात्र फुटीनंतर ताकद कमी झाल्याचे बोलले जात होते. रवींद्र धंगेकर मूळचे शिवसेनेचे होते. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. मनसेतील प्रवेशानंतर त्यांनी २००९ मध्ये विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यात बापट यांना त्यांनी कडवी लढत दिली होती. बापट या निवडणुकीत आठ हजार मतांनी विजयी झाले होते. शिवसेना आणि मनसेशी धंगेकर यांचे संबंध असल्याचा फायदाही या निवडणुकीत झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – Kasba By Poll Result 2023: “निवडून येणारे उमेदवार दिले तर मविआ राज्याच्या निवडणुकीतही जिंकेल” -अजित पवार

हेही वाचा – कसब्यात भाजपचा फुगा फुटला

मनसेने भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, मनसेच्या कार्यकर्त्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने ते साथ देतील, असे धंगेकर यांनी सांगितले होते. राज ठाकरे यांनी भाजपा उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्याचा आदेश दिल्यानंतरही मनसेचे काही कार्यकर्ते धंगेकरांच्या प्रचारात सहभागी झाले होते. त्यामुळे सात पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीनंतर मनसेच्या कसब्यातील पन्नास कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. मात्र, हे कार्यकर्ते मनसेत नसल्याचा दावा मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यामुळे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचीही रवींद्र धंगेकर यांना छुपी मदत झाल्याचे दिसत आहे.