आवक वाढल्याने जुडी ५ ते १० रुपयांना
पुणे : किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीची विक्री ५० ते ६० रुपये अशा उच्चांकी दराने झाल्यानंतर किरकोळ तसेच घाऊक बाजारात आवक वाढल्याने कोथिंबीर आणि मेथीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
अवेळी झालेल्या पावसामुळे यंदा पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागात पाऊस सुरू होता. ऑक्टोबर महिन्यात पावसाने झोडपून काढले होते. पावसाळ्यानंतर लागवड केलेल्या पालेभाज्या शेतात खराब झाल्या होत्या. त्यामुळे बाजारात पालेभाज्यांची टंचाई जाणवत
होती. पावसामुळे भिजलेल्या दुय्यम प्रतीच्या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली होती.
कोथिंबीर आणि मेथीला महिन्याभरापूर्वी उच्चांकी दर मिळाले होते. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीची विक्री ५० ते ६० रुपये दराने होत होती. मेथीच्या एका जुडीचा दर ३५ ते ४० रुपये असा होता.अन्य पालेभाज्यांच्या तुलनेत कोथिंबीर आणि मेथीला मागणी जास्त असते. आवक अपुरी आणि मागणी जास्त असल्याने कोथिंबीर आणि मेथीला उच्चांकी दर मिळाले होते, अशी माहिती किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिली.
दरम्यान, रविवारी (१५ डिसेंबर) श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील तरकारी विभागात पुणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या भागातून पालेभाज्यांची आवक वाढली. बाजारात तीन लाख जुडी कोथिंबीर तसेच मेथीच्या दोन लाख जुडय़ांची आवक झाली. आवक वाढल्याने मेथी, कोथिंबीर, पुदिना, पालक, अंबाडीच्या दरात घट झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीला प्रतवारीनुसार एक ते चार रुपये, मेथीच्या एका जुडीला तीन ते पाच रुपये असा दर मिळाला, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.
गेल्या आठवडय़ात कोथिंबिरीच्या शेकडा जुडीला घाऊक बाजारात ५०० ते १३०० आणि मेथीच्या शेकडा जुडीला २०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. रविवारी बाजारात आवक वाढल्याने कोथिंबिरीच्या शेकडा जुडीला १०० ते ४०० रुपये आणि मेथीच्या शेकडा जुडीला ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. कांदापात, पालक, मुळा या पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत.
किरकोळ बाजारातील पालेभाज्यांचे दर
* कोथिंबीर- ५ ते १० रुपये
* मेथी- ५ ते १० रुपये
* पुदिना- २ ते ३ रुपये
* पालक- १५ ते २० रुपये
* कांदापात- ३० ते ४० रुपये
* मुळा- २५ ते ३० रुपये