पुणे : राज्यात आणि शहरात वाढत असलेली करोनाबाधितांची संख्या आणि राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलण्यात येत असलेली नियमावली यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात आला आहे. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे २ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत हा महोत्सव होणार होता. महाराष्ट्रीय मंडळाच्या मुकुंदनगर येथील कटारिया प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेला ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात येत असल्याचे मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळविले आहे. त्यामुळे करोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी हा महोत्सव होऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सद्य:स्थितीमुळे..
पं. भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने महोत्सव व्हावा, अशी रसिकांची प्रबळ इच्छा होती. परंतु, महोत्सवाची भव्यता, व्याप्ती आणि आयोजनासाठी लागणारा वेळ बघता सद्य परिस्थितीत महोत्सव रद्द करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.