शरद पवार यांची अपेक्षा

पुणे : करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. राज्य सरकार आणि विशेषत: मुख्यमंत्री त्याचे कटाक्षाने पालन करत आाहेत. या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सुसंवाद आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विचारांच्या राज्यातील लोकांनी तारतम्य बाळगावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंदिरे खुली करण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या आंदोलनावर भाष्य केले.

महापालिकेतर्फे आयोजित कार्यक्रमात कर्वेनगर-वारजे प्रभागातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूलचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी भाजप आणि मनसे या दोन पक्षांची आंदोलने सुरू आहेत याकडे लक्ष वेधले असता ‘कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे,’ अशी टिपणी पवार यांनी केली.

केंद्र सरकारकडून विरोधकांना नमविण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी)चा वापर होत आहे. तो केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. तर पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिणेतील राज्यातही होत आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

शेतकरी गेल्या चौदा महिन्यांपासून घरदार सोडून, थंडी, ऊन, पाऊस कशाचाही विचार न करता आंदोलन करत आहेत. राज्यकर्ते संवेदनशील असतील, तर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची नोंद त्यांनी घ्यायला हवी होती, ही अपेक्षा व्यक्त करून पवार यांनी ‘दुर्दैवाने अन्नदात्याकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे,’ अशी टीका केली.

आम्ही आमचा शब्द पाळला

शेती आणि सहकार क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून घ्यावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या वतीने राज्य सरकारने राज्यपालांना दिला आहे. त्याबाबत राज्यपालांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र त्याबाबत ‘करेक्ट कार्यक्रम करू’ असा इशारा देणारी विधाने कशी केली जातात, याचे मला आश्चर्य वाटते. राजू शेट्टी यांनी काय वक्तव्य करायचे, हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही दिलेला शब्द पाळला असून, राज्यपाल काय करतात, याची वाट पाहत आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले.