पुणे : करोनाबाधित रुग्णांचे निधन झाल्यास संबंधित रुग्णांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार नाहीत. त्या मृतदेहांवर गॅस किंवा विद्युत दाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. करोनाबाधित मृतदेह दफन करायचे असल्यास शहरापासून दूर अंतरावर सहा फूट खोल खड्डा खणून आणि त्यामध्ये र्निजतुक लिक्विड टाकून मृतदेह प्लास्टिकच्या दोन बॅगांमध्ये दफन केले जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाचही जिल्ह्य़ांचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी यांच्याशी डॉ. म्हैसेकर यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. विभागामध्ये आवश्यकता असेल, तरच भाजीपाला सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र, सामाजिक अंतराचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास संबंधित ठिकाणांचा भाजीपाला पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून १४ एप्रिलनंतर टाळेबंदीचा कालावधी वाढवला किंवा टप्प्याटप्प्याने कमी केला जाऊ शकतो. या दोन्ही शक्यता गृहीत धरून नियोजन करण्याबाबतीत चर्चा करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारने वैद्यकीय उपचार पद्धतीबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड काळजी केंद्र, कोविड आरोग्य केंद्र आणि कोविड रुग्णालय तयार करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. करोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांबाबत कशा पद्धतीने कार्यवाही करायची, याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. विभागात जीवनावश्यक वस्तू, औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या यांचा पुरवठा सुरू राहणार आहे. आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी, रक्तदाब आणि मधुमेह नसलेल्या निवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुण्यातील उपबाजार, आठवडे बाजार पूर्णत: बंद

पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजार गुरुवारी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मोशी, उत्तमनगर आणि खडकी येथील उपबाजार सुरू ठेवण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन हे उपबाजार बंद करण्यात आले आहेत. करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने खडकी, मोशी आणि उत्तमनगर येथील उपबाजार शुक्रवारपासून बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरासह जिल्ह्य़ातील उपबाजार आणि आठवडे बाजार पूर्णत: बंद करण्यात आले असून आतापर्यंत आवक झालेल्या मालाची विक्री होईपर्यंतच भाजीपाला नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.