पुणे : पुणे महानगरपालिका आयुक्तांचा शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिकेशेजारी तब्बल दीड एकरमध्ये प्रशस्त असा बंगला आहे.या बंगल्यामध्ये 24 तास सुरक्षारक्षक आणि बंगल्याचा आसपासच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.यामुळे प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर लक्ष ठेवले जाते.त्याच बरोबर या परिसरात काही आमदार आणि उद्योजक देखील वास्तव्यास आहे.यामुळे या परिसरात प्रशासनाचे विशेष लक्ष असते. एवढ्या सर्व सोयीसुविधा असून देखील महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या बंगल्यातून महागडी झुंबरे,शोभेच्या वस्तू,टीव्ही, एसी आणि अन्य विद्युत उपकरणे गायब झाली आहेत.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारून जवळपास दोन महिन्याचा कालावधी होत आला आहे.त्यापूर्वी डॉ.राजेंद्र भोसले हे महापालिका आयुक्त होते आणि ते चित्तरंजन वाटिका येथील बंगल्यात राहत होते.त्यांच्यानंतर नवल किशोर राम हे राहण्यास येणार असल्याने,महापालिका भवन,विद्युत, सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घराची पाहणी केली.त्यावेळी घरातील चार एसी,झुंबर,ऐतिहासिक वास्तूंच्या चित्रांसह अन्य चित्रे,जुन्या काळातील पितळी कांस्य धातूचे दिवे, दोन मोठे एलईडी टीव्ही,कॉफी मेकर, वॉकीटॉकी सेट,रिमोट बेल्स, चिमणीसह सुसज्ज किचन टॉप, वॉटर प्युरिफायर असे साहित्य घरात नसल्याचे समोर आले.यामुळे एकच खळबळ उडाली.या वस्तु नेमक्या कुठे गेल्या,अशी चर्चा अधिकारी वर्गामध्ये सुरू झाली.त्याच दरम्यान आवश्यक अशा काही वस्तूची प्रशासनामार्फत खरेदी तात्काळ करण्यात आली आहे.मात्र अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी 20 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे.पण मुद्दा हाच राहतो की,महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातील वस्तू नेमक्या कुठे गेल्या अशी चर्चा सुरू झाली.

याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले,या बंगल्याची जबाबदारी भवन विभागाची आहे.त्यामुळे येथील साहित्य कुठे गेले.हे पाहणे त्यांचे काम आहे.त्यामुळे याबाबत संबधित अधिकार्‍याची चौकशी केली जाईल,त्यातून सर्व माहिती समोर येईल असे त्यांनी सांगितले.