पुणे जिल्ह्य़ातील खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांसाठी स्वतंत्र सत्र न्यायालयाच्या मागणीचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या तीन तालुक्यांसाठी पुढील आठवडय़ापासून स्वतंत्र सत्र न्यायालय सुरू होत आहेत. या ठिकाणी पुणे सत्र न्यायालयातील तीन हजार खटले वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा सत्र न्यायालयावरचा ताण काही प्रमाणात कमी होणार असून पक्षकारांनासुद्धा दूरचा प्रवास टळणार आहे.
खेड येथे बऱ्याच दिवसांपासून जिल्हा व सत्र न्यायालय, वरिष्ठ दिवाणी न्यायालय सुरू करण्याची मागणी होती. भीमाशंकर, ओतूर, माळशेज घाट या परिसरातील पक्षकारांना पुणे सत्र न्यायालयात खटल्याच्या कामकाजासाठी यायचे असल्यास दूरचा प्रवास करावा लागे. त्यामुळे खेड येथे सत्र न्यायालय असावे या मागणीला मंजुरी देत खेड येथे दोन वर्षांपूर्वी न्यायालयाची इमारत बांधून त्याचे उद्घाटन करण्यात आले. पण, आंबेगाव तालुक्यातील नागरिकांनी विरोध केल्यामुळे या ठिकाणी सुरू होण्याचा प्रश्न खोळंबला होता. मात्र, पुणे बार असोसिएशन आणि खेड, जुन्नर येथील वकिलांनी आंबेगाव येथील नागरिकांशी चर्चा करून हा प्रश्न सोडविल्यानंतर खेड येथे सत्र न्यायालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे. येत्या सहा एप्रिल रोजी येथील न्यायालयाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नरेश पाटील, न्यायमूर्ती राजेश केतकर आणि पुणे जिल्ह्य़ाचे मुख्य न्यायाधीश कालीदास वडणे हे उपस्थित राहणार आहेत.
याबाबत पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विकास ढगे-पाटील यांनी सांगितले की, या ठिकाणी सत्र न्यायालय होण्यासाठी बार कडून सतत पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार हे न्यायालय सुरू झाले आहे. या ठिकाणी पुणे जिल्हा न्यायालयातील आंबेगाव, खेड आणि जुन्नर भागातील तीन हजार खटले त्या ठिकाणी वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे शिवाजीनगर न्यायालयावरील काही भार हलका होणार आहे. जुन्नर तालुक्यातील पक्षकारांना पुण्यात यायचे झाल्यास दूरवर प्रवास करावा लागत होता. मात्र, आता जवळच न्यायालय झाल्यामुळे त्यांच्या वेळेत बचत होणार आहे. चाकण येथे औद्योगिक पट्टा असून हा भाग झपाटय़ाने विकसित होत आहे. त्यामुळे या भागात खटले दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे.