अडविणाऱ्या नागरिकांवर पिस्तूल रोखले

पुणे : जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत बहिणीवर चाकूने वार केल्याचा प्रकार महर्षीनगर परिसरात बुधवारी रात्री घडला. घटनेनंतर पळून जाणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने नागरिकांवर पिस्तूल रोखले. मात्र, एका तरुणाने त्याच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेत त्याला पकडले.

विनोद मधुकर सराफ (वय ४४, रा. गुजराथ कॉलनी, कोथरूड) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. बहिणीच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सराफ हा मूळचा जळगावच्या यावल येथील आहे. तो उच्चशिक्षित असून, गेल्या अनेक वर्षांपासून तो वडिलांनी कोथरूड येथे बांधलेल्या इमारतीत कुटुंबासह राहतो. सुमारे १५ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी गावाकडील जमीन विकली होती. या व्यवहाराला सराफ याच्या चुलत्यांनी आक्षेप घेतला होता. सध्या हे प्रकरण प्रलंबित आहे.

जमीन विक्रीच्या प्रकरणातील आक्षेपानंतर दोन्ही परिवारात वाद निर्माण झाला आहे. हा वाद मिटत नसल्याने चुलत भावाला मारण्याच्या उद्देशाने सराफ बुधवारी रात्री मद्यपान करून महर्षीनगर येथे आला. त्याच्याकडे चाकू आणि पिस्तूलही होते. घरामध्ये चुलत भावाऐवजी चुलत बहीण होती. त्याने तिच्यावरच चाकूने वार केले. तिने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक जमा झाले. हे पाहून त्याने नागरिकांवर पिस्तूल रोखले. मात्र आलम शेख या तरुणाने त्याच्याकडील पिस्तूल हिसकावून त्याला पकडले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सराफ याला ताब्यात घेतले.