पुणे: राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) आणि प्रवेश प्रक्रियांची माहितीसाठी ‘महा सीईटी सेल’ हे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरणे आदी सुविधा या अॅपवर देण्यात आल्या आहेत.
माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी ही माहिती दिली. सीईटी सेलकडून विविध पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात येतात. या सीईटी परीक्षांच्या माहिती पुस्तिका डाऊनलोड करणे, अर्ज भरणे, शुल्क भरणे, त्यानंतर सीईटी परीक्षा होऊन निकाल जाहीर होणे या बाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता असते. तसेच निकालानंतर प्रवेश प्रक्रियांची नोंदणी, कागदपत्रे अपलोड करणे, महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे अशी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. आतापर्यंत ही प्रक्रिया सीईटी सेलच्या संकेतस्थळाद्वारे करण्यात येत होती. मात्र संकेतस्थळ न चालणे, सर्व्हरला अडचणी येणे अशा समस्या उद्भवतात. या तांत्रिक अडचणींना पर्याय म्हणून सीईटी सेलने ‘महासीईटी सेल’ या नावाने गुगल प्ले स्टोअरवर अॅप्लिकेशन विनामूल्य उपलब्ध केले आहे. सीईटी सेलकडून प्रसिद्ध करण्यात येणारी सर्व माहिती संकेतस्थळासह आता अॅप्लिकेशनवरही उपलब्ध होणार आहे.