पुणे : प्रेमसंबंध तोडल्याने प्रेयसीवर गोळीबार करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तीन काडतुसे, दुचाकी असा एक लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खडकी बाजार परिसरात ही कारवाई करण्यात आली. गौरव महेश नायडू (वय २५, रा. श्रीरंग रेसीडन्सी, गायकवाडनगर, पुनावळे, पिंपरी-चिंचवड) असे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. नायडू आणि एका तरुणीचे प्रेमसंबंध होते. तरुणीने नायडूच्या वर्तनामुळे त्याच्याशी बोलणे बंद करून प्रेमसंबंध तोडले होते. तरुणीने त्याला झिडकारल्याने नायडू चिडला होता. तरुणी एमबीए अभ्यासक्रम करत असून, ती बाणेर भागातील एका कंपनीत प्रशिक्षण घेत होती.
तरुणी २९ ऑगस्ट रोजी बाणेर भागातील वीरभद्रनगर परिसरात असलेल्या कंपनीत निघाली होती. त्या वेळी नायडूने तिला कंपनीच्या आवारात अडवले. संशय येऊ नये म्हणून त्याने डिलिव्हरी बाॅयसारखा वेश परिधान केला होता. नायडूने तरुणीवर पिस्तूल रोखले. तरुणीवर पिस्तुलातून तीन वेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुलातून गोळी सुटली नाही. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर नायडू दुचाकीवरून पसार झाला.
त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाणेर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाकडून आरोपीचा शोध घेण्यात येत होता. तरुणीवर गोळीबार करणारा आरोपी खडकी बाजार परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून नायडूला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अमर कदम, उपनिरीक्षक वैभव मगदूम, हरीश मोरे, किशोर दुशिंग, सुभाष आव्हाड, जहांगीर पठाण, विठ्ठल वाव्हळ, अजय गायकवाड, प्रवीण भालचिम, तुषार खराडे, विनोद महाजन, अमजद शेख, नागेशिंसग कुंवर, शरद झांजरे, मयुरी नलावडे, रोहिणी पांढरकर यांनी ही कामगिरी केली.