हेल्मेट घालून दोन दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी राष्ट्रवादी कामगार सेलचे मावळ तालुका अध्यक्ष पंढरीनाथ हरिभाऊ सातकर यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार केला. यामध्ये सातकर हे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव येथे ही घटना घडली. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव येथे पूजा हॉटेलचे मालक दत्तात्रय लालगुडे यांच्यासोबत सातकर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी दोन दुचाकीवरून चार हल्लेखोर हॉटेलमध्ये आले. या चारही हल्लेखोरांनी हेल्मेट घातलेले होते. हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने सातकर यांना पाठीमागून तीन गोळ्या घातल्या. त्यातील एक गोळी सातकर यांच्या डोक्याला, एक पाठीत आणि एक हाताला चाटून गेली आहे. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पहिल्यांदा लोणावळाच्या दिशेने पळून गेले. येथील नागरिकांनी सातकर यांना पहिल्यांदा सोमाटणे फाटा येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना थेरगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. गोळीबार झाल्याची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांनी हेल्मेट घातल्यामुळे त्यांचे चेहरे दिसू शकलेले नाहीत. याप्रकरणी त्यांचा शोध सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2013 रोजी प्रकाशित
वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी कामगार सेलच्या तालुका अध्यक्षांवर गोळीबार
हेल्मेट घालून दोन दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी राष्ट्रवादी कामगार सेलचे मावळ तालुका अध्यक्ष पंढरीनाथ हरिभाऊ सातकर यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार केला.
First published on: 23-12-2013 at 02:38 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime firing in vadgaon maval ncp leader pimpri pune