पुणे : मावळमधील चांदखेड येथे अविनाश गोठे या आरोपीने यात्रेत गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या शिरगाव पोलीस ठाण्यात आरोपी अविनाश गोठेसह पाच जणांवर हत्येचा प्रयत्न आणि आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश हा राष्ट्रवादी माथाडी कामगार युनियनचा अध्यक्ष असल्याचे नमूद असलेला एक फोटो समोर आला असून, मावळ राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नियुक्ती पत्र दिल्याचे फोटोत दिसत आहे. तो फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल फोटोवरून आमदार सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिली असून, संबंधित व्यक्तीवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी दिली. अशा व्यक्तीचे पद देखील संबंधितांनी तातडीने काढून हकालपट्टी करावी, असे देखील त्यांनी म्हटले आहे. या घटनेप्रकरणी अविनाश बाळासाहेब गोठे, विजय अशोक खंडागळे, अमर उत्तम शिंदे, मनीष शिवचरण यादव, अनिकेत अनंत पवार, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहेत. 

हेही वाचा – पुणे : गंमत म्हणून भिरकावलेला दगड प्रवाशाला लागला, अल्पवयीन मुलाचे कृत्य, रेल्वेतील अल्पवयीनच जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील चांदखेड येथे यात्रा असल्याने अनेक नागरिक जमा झाले होते. याच गर्दीचा फायदा घेऊन अविनाश आणि त्याच्या मित्रांनी वाहनांच्या काचा फोडून, फ्लेक्स फाडून आणि कोयते नाचवून दहशत पसरवली. ऐन गर्दीच्या ठिकाणी अविनाशने पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. यात सुदैवाने कोणीही जखमी नाही. शिरगाव पोलिसांनी अवघ्या काही तसांतच आरोपींना बेड्या ठोकल्या.

हेही वाचा – पुणे : जी-२० परिषदेनिमित्त देशभरात ‘ऑनलाइन सुरक्षित राहा’ जागृती मोहीम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अविनाश बाळासाहेब गोठे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याअगोदर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. तो राष्ट्रवादी पक्षाच्या माथाडी कामगार युनियनचा अध्यक्ष असल्याचे देखील आता समोर आले आहे. मावळेचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी अविनाशला नियुक्ती पत्र दिले होते. यावर आमदार सुनील शेळके म्हणाले की, माथाडीचे काही व्यक्ती माझ्याकडे आले होते. तेव्हा मी ते नियुक्ती पत्र दिले. पण, माथाडी युनियन अध्यक्षची नियुक्ती मी करत नाही. त्या व्यक्तीवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, असे आमदार शेळके म्हणाले.