अविनाश कवठेकर

पुणे : वाहतूक कोंडीत अडकलेला स्वारगेट-कात्रज रस्त्यावर महापालिकेकडून पुन्हा कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होणार आहे. रस्ता दुभाजक आणि पदपथ सुशोभीकरणाच्या नावाखाली सुमारे दोन कोटी रुपये खर्च होणार असून, त्यासाठी दोन स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे सातारा रस्त्यावरील उधळपट्टीची परंपरा कायम राहिली आहे.

दक्षिण पुण्यातील प्रमुख रस्ता असलेल्या सातारा रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी अलीकडच्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या रस्त्यावरील स्वारगेट-कात्रज या बीआरटी मार्गाची पुनरर्चना, सुशोभीकरण आणि देखभाल दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपयांचा खर्च महापालिकेने यापूर्वीच केला आहे. त्यानंतरही सातारा रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या कायम राहिली आहे. त्यानंतर आता या स्वारगेट-कात्रज या दरम्यानचे पदपथ आणि दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील दोन स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या असून त्याला प्रशासक विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

आणखी वाचा-पुण्याला यंदा मिळणार पाणी कमी?…जाणून घ्या किती?

स्वारगेट-कात्रज रस्त्यावरील दुभाजक दुरुस्ती, रंगकाम, थरामोप्लास्टिक पेंट, दिशादर्शक फलक अशी कामे करण्यासाठी २६ लाख ८४ हजार ९८९ रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. सुरेखा कन्स्ट्रक्शन या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. तसेच स्वारगेट-कात्रज रस्त्यावरील पदपथांची दुरुस्ती, रंगकाम आणि दिशादर्शक फलक उभारण्यासाठी एमएस काशिनाथ सीताराम कुमावत या कंपनीला एक कोटी ६३ लाख ५४ हजार रुपयांचे काम देण्यात आले आहे.

या दोन्ही कामांसाठी पूर्वगणन पत्रक मान्य करण्यात आले होते. रस्ता दुभाजक दुरुस्तीसाठी ४७ लाख ९९ हजार ७०८ कोटींचे पूर्वगणन पत्रक तर पदपथ दुरुस्तीसाठी २ कोटी ४९ लाख ९९ हजार ५९२ रुपयांचे पूर्वगणन पत्रक मंजूर करण्यात आले होते. पथ विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनीही त्याला मंजुरी दिली होती. तसेच तांत्रिक छाननी समितीनेही मान्यता दिली होती.

आणखी वाचा-मेट्रोच्या खांबांचा उड्डाणपुलाला ‘थांबा’! मेट्रो आणि महापालिकेचे एकमेकांकडे बोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही महिन्यांपूर्वी पथ विभागाने ९९ लाख ८३ हजार रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले होते. या कामांमध्ये खोदकाम, सपाटीकरण, काँक्रिटीकरण, ड्रेनेज चेंबरची झाकणे समपातळीवर आणणे, बोलार्ड्स बसविणे, इंटरलॉकिंग ब्लॉक बसविणे यासह विविध प्रकारच्या कामांचा समावेश होता. त्यासाठी ६५ लाख रुपयांचा खर्च महापालिकेने केला होता.