हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारुन खवय्यांनी सरत्या वर्षाला निरोप दिला. मासळी, मटण, चिकन खरेदीसाठी सामिष खवय्यांची बाजारात गर्दी झाली होती.
हेही वाचा- पुणे : मेट्रोच्या कामासाठी कामगार पुतळा परिसरात वाहतूक बदल; शाहीर अमर शेख चौकाकडे जाण्यास मनाई
गणेश पेठेतील मासळी बाजारात सकाळपासून खवय्यांची गर्दी होती. कसबा पेठेतील मटण मार्केट, लष्कर भागातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट, कर्वे रस्त्यावरील मटण मार्केट, फर्ग्युसन रस्त्यावरील वीर चापेकर मार्केट परिसरात गर्दी झाली होती तसेच पौड फाटा, विश्रांतवाडी, पद्मावती येथील मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी १५ ते २० टन, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची १५ ते २० टन, नदीतील मासळी ५०० किलो, खाडीतील मासळी २०० ते ४०० किलो अशी आवक झाली, अशी माहिती गणेश पेठेतील मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
हेही वाचा- कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त वाहतूक बदल
घरगुती ग्राहकांसह हाॅटेल व्यावसायिकांकडून मासळीला चांगली मागणी होती. खवय्यांकडून पापलेट, कोळंबी, सुरमई, रावस, हलवा, ओले बोंबील या मासळीला चांगली मागणी होती, असे परदेशी यांनी सांगितले. मटणाला चांगली मागणी राहिली. हाॅटेल व्यावसायिकांकडून मागणी वाढल्याचे पुणे शहर मटण दुकानदार संघटनेचे प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. चिकनच्या दर स्थिर होते. केटरिंग व्यावसायिक, हाॅटेल चालक तसेच घरगुती ग्राहकांकडून चिकनला मागणी होती, असे पुणे, पिंपरी बाॅयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी नमूद केले.
हेही वाचा- विमानतळावरील सर्वेक्षणात पुण्यातील आणखी एका प्रवाशाला करोना संसर्ग
मटण, चिकन, मासळीचे किलोचे दर
मटण- ७०० रुपये
चिकन- २२० रुपये
पापलेट- ७०० ते १८०० रुपये
हलवा- ५०० ते ६५० रुपये
सुरमई- ४०० ते ५५० रुपये
ओले बोंबिल- २०० ते ३६० रुपये
कोळंबी- १६० ते ८०० रुपये