पुणे : हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्वाच्या असलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त गुरुवारी (१० जुलै) सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची पर्वणी अनुभवता येणार आहे. यंदा गुरुपौर्णिमा गुरुवारी आल्यामुळे सर्वांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
महर्षी विनोद रीसर्च फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी (१० जुलै) टिळक स्मारक मंदिर येथे रात्री साडेआठ वाजता व्यासपूजा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये आत्मयोग गुरू डाॅ. संप्रदास विनोद यांच्या ‘आत्मयोग’ संकल्पनेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. आत्मयोगसाधक प्रवीण वाघमारे यांचे प्रातिनिधिक अनुभवकथन होणार आहे. त्यापूर्वी विजयानगर काॅलनी येथील शांती मंदिरामध्ये सकाळी आठ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात श्रमिकांचा सन्मान करण्यात येणार असून, डाॅ. संप्रसाद विनोद साधकांना आशीर्वाद देतील.
गोवा येथील सद्गुरू पारवडेश्वर महाराज ट्रस्टच्या पुणे शाखेतर्फे गुरुवारी नऱ्हे आंबेगाव येथील शिवसृष्टीमागे असलेल्या ऐश्वर्या बँक्वेट हॉल येथे सकाळी अकरा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात सद्गुरू भाऊ महाराज यांच्या हस्ते प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना शौर्य पुरस्कार, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांना मच्छिंद्रनाथ पुरस्कार आणि ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक सूर्यकांत काकडे यांना गोरक्षनाथ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमात पुणे महापालिकेच्या नगरसचिव योगिता भोसले यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष तात्यासाहेब भिंताडे यांना गहिनीनाथ पुरस्कार, गिर्यारोहण मार्गदर्शक सुरेंद्र शेळके यांना भर्तरीनाथ पुरस्कार, पुणे पीपल्स मल्टिस्टेट बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे यांना जालिंदरनाथ पुरस्कार, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे सदस्य बाळासाहेब लोहकरे यांना नागनाथ पुरस्कार, व्यसनमुक्ती व पुनर्वसन क्षेत्रातील कार्यकर्ते सुभाष हगवणे यांना रेवणनाथ पुरस्कार, ‘ग्यान की’ लायब्ररीचे प्रदीप लोखंडे यांना कानिफनाथ पुरस्कार, उद्योजक राजेश पवार यांना चर्पटीनाथ पुरस्कार आणि मे. दाते आणि कंपनी मंडप कॉन्ट्रॅक्टर या संस्थेस शताब्दी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
तसेच या वेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षय ताठे, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शुभम कराळे, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सागर नळकांडे आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुमेधा वाखारे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
गुनिजान परिवाराचा गुरुपौर्णिमा उत्सव
ज्येष्ठ गायक पं. सी. आर. व्यास ऊर्फ गुनिजान परिवाराच्या वतीने शनिवारी (१२ जुलै) गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. कोथरूड येथील रामबाग काॅलनी येथील भारती विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी नऊ वाजता होणाऱ्या पहिल्या सत्रात गोडसे, ऐश्वर्या परदेशी, आदित्य व्यास, श्याम गुंडावार, अपर्णा केळकर आणि पं. सी. आर. व्यास यांचे पुत्र व शिष्य पंडित सुहास व्यास यांचे गायन होणार आहे. तर, संध्याकाळी पाच वाजता सुरू होणाऱ्या सत्रात ज्ञानराज औसेकर, ऋतुजा वाणी, केदार केळकर, शर्वरी वैद्य, आनंद बेंद्रे, आणि श्रीराम शिंत्रे यांचे गायन होणार आहे.