पुणे : महावितरण कंपनीच्या पुणे विभागातील ५६ लाख वीजग्राहक वीजबिल भरण्याच्या रांगेतून बाहेर पडले आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये या ग्राहकांनी तब्बल १३७५ कोटी रुपयांचे वीजबिल ऑनलाइन पद्धतीने सुरक्षितपणे भरले आहेत. आर्थिक वर्षातील एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत या ग्राहकांकडून ४११२ कोटी ७१ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा झाला आहे.

वीजबिल भरणा केंद्राच्या रांगेत न थांबता अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून बिलाचा भरणा करण्याच्या विविध सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातील ऑनलाइन पद्धतीच्या वीजबिल भरण्याच्या पर्यायाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या एप्रिल ते सप्टेंबर २०२२ पर्यंत पुणे परिमंडळातील लघुदाब वर्गवारीतील सरासरी १७ लाख ४१ हजार ८६० वीजग्राहक दरमहा ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा करीत होते. मात्र, ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत ग्राहकांची दरमहा सरासरी संख्या थेट १८ लाख ६४ हजार ८२२ वर गेली आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये ‘ऑनलाइन’द्वारे वीजबिल भरणाऱ्या पुणे परिमंडलातील ग्राहकांची संख्या २० लाखांवर जाईल असे चित्र आहे.

हेही वाचा – पुणे : पोलीस विभागातच चोरी करणारा गजाआड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या तिमाहीमध्ये पुणे शहरातील ३१ लाख ५६ हजार ६९ लघुदाब वीजग्राहकांनी ७४० कोटी ४० लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. यामध्ये महावितरणच्या बंडगार्डन विभागातील सर्वाधिक ५ लाख २८ हजार २४८ ग्राहकांचा समावेश आहे. उर्वरित शिवाजीनगर, कोथरूड, नगररोड, पद्मावती, पर्वती व रास्तापेठ विभागांमध्ये दरमहा सरासरी ४ लाख ३८ हजार वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास पसंती दिली आहे.