पुणे : सायबर चोरट्यांकडून वेगवेगळी आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. शेअर बाजारात गुंतवणूक, घरातून ऑनलाइन कामाची संधी, तसेच कारवाईची भीती दाखवून चोरट्यांनी तक्ररादारांची ९७ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने कात्रज भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी २९ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत त्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. चोरट्यांनी त्यांना सुरुवातीला काही रक्कम भरण्यास सांगितले.
चोरट्यांच्या खात्यात त्यांनी पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासविले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या खात्यात आणखी रक्कम जमा केली. एकूण मिळून २९ लाख ६९ हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे तपास करत आहेत.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका तरुणाची ३३ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत तरुणाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे तपास करत आहेत. अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी बिबवेवाडी भागातील एका तरुणाची चार लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.
घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महात्मा फुले पेठेतील एका तरुणाची ११ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका तरुणाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले. तरुणाला सुरुवातीला ऑनलाइन पद्धतीने केलेल्या कामाचे पैसे दिले. त्यानंतर तरुणाने आणखी पैसे चोरट्यांच्या खात्यात जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याने तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करत आहेत.
कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूक
काळ्या पैसे व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी कोंढवा परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तपास करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सक्त वसुली संचानालय (ईडी), अमली पदार्थ विरोधी पथक, (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो), तसेच केंद्रीय गुन्हे अन्वे्षण विभागाकडून (सीबीआय) कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.
