पुणे : सायबर चोरट्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या आमिषाने अकरा जणांची एक कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत. घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, असे आमिष दाखवून चोरट्यांनी एका महिलेची चोरट्यांनी २४ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी महिलेला आमिष दाखवून तिच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत. ऑनलाइन टास्कच्या आमिषाने बिबवेवाडी भागातील एका तरुणीची तीन लाख ९० हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. हडपसर भागातील एकाची ऑनलाइन टास्कच्या आमिषाने दोन लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची २० लाख १४ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास २०० टक्के परतावा देण्याच्या आमिषाने एकाची १० लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत एकाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे तपास करत आहेत. अशाच पद्धतीने चोरट्यांनी सिंहगड रस्ता भागातील एका महिलेची सात लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर तपास करत आहेत. हडपसर भागातील एका महिलेची शेअर बाजारात गुंतणुकीच्या आमिषाने पाच लाख १५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.
हेही वाचा…शैक्षणिक, अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण… शिक्षकांना कोणती कामे करावी लागणार?
कारवाईची भीती घालून २४ लाखांची फसणूक
बेकायदा आर्थिक व्यवहार प्रकरणात (मनी लॉड्रिंग) कारवाईची भीती घालून एका महिलेची १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. भीती घालून चोरट्यांनी महिलेला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत. कारवाईची भीती दाखवून चोरट्यांनी एका तरुणीची चार लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.य याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस असल्याच्या बतावणीने विश्रांतवाडीतील एका तरुणाची तीन लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत एका तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.