पुणे : बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यातून एक लाख ३८ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६४ वर्षीय ज्येष्ठ महिला सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत. त्यांच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. बँकेतून बोलत असून, बँक खाते अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. बँक खाते अद्ययावत न केल्यास खाते बंद पडेल, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून एक लाख ३८ हजार रुपयांची रोकड स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.

पावणेदोन लाखांना गंडा

घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची एक लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकारही उघडकीस आला. याबाबत एका तरुणाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्याला दाखविले होते. सुरुवातीला चोरट्यांनी त्याला एक काम दिले. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यानंतर त्याला परतावा दिला. परतावा मिळाल्याने तरुणाचा विश्वास बसला. चोरट्याने त्याला रक्कम गुंतविण्यास सांगितले. रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली.

शेअरमधील गुंतवणुकीचे आमिष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची सात लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महंमदवाडीत राहायला आहेत. चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. चोरट्यांनी त्यांना सुरुवातीला परतावा दिला. परतावा दिल्यानंतर आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. रक्कम गुंतविल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.