पुणे : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) कारवाईची भीती दाखवून एका महाविद्यालयीन तरुणाची सायबर चोरट्यांनी ४२ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत एका तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण बालेवाडी भागात राहायला आहे. तो पुण्यात शिक्षणासाठी आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. दिल्लीती सीबीआय कार्यालयातून अधिकारी बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली होती. चोरट्यांनी तरुणाकडे आधारकार्डबाबत विचारणा केली.
तुमच्या नावाच्या आधारकार्डचा कोणीतरी वापर करत आहे. आधारकार्डचा वापर करुन वेगवेगळ्या प्रकारचे ५० गुन्हे करण्यात आले आहेत. याप्रकरणात सीबीआयकडून कारवाई करण्यात येणार आहे’, अशी भीती चोरट्यांनी तरुणाला दाखविली. त्यानंतर कारवाई न करण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, असे चोरट्यांनी सांगितले.
गेल्या पाच ते सहा महिन्यात चोरट्यांनी तरुणाला धमकावून वेळोवेळी पैसे घेतले. तरुणाने वेगवेगळ्या बँक खात्यात ४२ लाख ९५ हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी त्यांच्याकडे आणखी रक्कम मागितली. अखेर घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करत आहेत.
फसवणुकीचे प्रकार वाढीस
ईडी, सीबीआय, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अशा तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची बतावणी करुन नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. नागरिकांनी अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेसह १६ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांकडून महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर मधुकर नेहेते (वय ६१, रा. साद अपार्टमेंट, मानाजीनगर, नऱ्हे), शीतल काळे (वय ४०, रा. ,शिवा हाईट्स, पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला भवानी पेठेत राहायला आहेत. आरोपी नेहेते आणि काळे यांच्याशी महिलेची ओळख झाली होती. त्या वेळी आरोपींनी शेअर बाजारात दलाल असल्याची माहिती महिलेला दिली होती. आरोपींनी महिलेला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. महिलेने सुरुवातील काही रक्कम आरोपींना गुंतवणुकीस दिली. त्यानंतर महिलेच्या ओळखीतील १६ जणांनी आरोपींकडे रक्कम गुंतविण्यास दिली. त्यांनी एकूण मिळून दोन लाख ७९ हजार रुपये रक्कम गुंतवणुकीस दिली. रक्कम गुंतविल्यानंतर त्यांनी परतावा दिला नाही.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.