पुणे : ‘घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी आहे,’ असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी कात्रज भागातील एका महिलेची १४ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आंबेगाव खुर्द परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना गेल्या वर्षी संदेश पाठविला होता.

‘ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास दररोज दोन ते तीन हजार रुपये मिळतात. समाज माध्यमातील चित्रफिती, तसेच मजकुरास प्रेक्षक पसंती मिळवून दिल्यास चांगला परतावा मिळेल,’ असे आमिष दाखवून चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला ऑनलाइन काम (ऑनलाइन टास्क) दिले. महिलेने काम पूर्ण केल्यानंतर चोरट्यांनी तिला परताव्यापोटी चार हजार ९२० रुपये दिले. त्यामुळे महिलेचा विश्वास बसला.

ऑनलाइन टास्कमध्ये आणखी रक्कम गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात गेल्या सात ते आठ महिन्यांत वेळोवेळी १४ लाख २५ हजार रुपये गुंतविले. पैसे गुंतविल्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिणे तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘शहरात ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणुकीचे गुन्हे वाढीस लागले आहेत. चोरट्यांनी सामान्यांना आमिष दाखवून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करा,’ असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.