शिवाजीनगरच्या मोदीबाग येथील सुमंगल अपार्टमेंटमध्ये रविवारी पहाटे तीनच्या सुमारास दोन सदनिकेत पाच ते सहा दरोडेखोरांनी दरोडा घातला. अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या अंगावर दरोडेखोरांनी गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मोटार सोडून पलायन करणाऱ्या दरोडेखोरांपैकी एकाला पकडण्यामध्ये यश आले, पण त्याने केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला. या चोराचे इतर साथीदार मात्र सहा लाखांचे दागिने घेऊन पसार झाले.
या घटनेत पोलीस कर्मचारी एस. बी. माने हे जखमी झाले आहेत. या ठिकाणी पकडलेल्या दरोडेखोराचे नाव उधलसिंग जब्बुसिंग दुधानी (वय २३, रा. रामटेकडी, पुणे) असे आहे. त्याचे इतर साथीदार उजालासिंग टाक (वय २१), लखनसिंग रजपतसिंग दुधाणी (वय २१) आणि तिलकसिंग टाक (वय २२, रा. रामटेकडी) हे फरार आहेत. हे सर्व जे. डी. सिंग टोळीचे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पंचवीस ते तीस दरोडय़ाचे गुन्हे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश सरतापे आणि त्यांचे कर्मचारी रविवारी पहाटे तीनच्या सुमारास सिमला ऑफीस चौकात नाकाबंदी करत होते. त्यावेळी त्यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून मोदीबागेतील एका इमारतीमध्ये चोरी झाल्याचे सांगण्यात आले. सरतापे हे कर्मचारी घेऊन त्या ठिकाणी पाच मिनिटांमध्ये पोहोचले. त्यावेळी पाच ते सहाजण मोटारीत बसून पळून जाण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी खाली उतरून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी पोलिसांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केला. सरतापे यांच्या मागे पेट्रोलिंग व्हॅन आली होती. त्यामुळे दरोडेखोरांना त्यांची गाडी पाठीमागे घेऊन पुन्हा दोन्ही मोटारीच्या मधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना शेजारच्या एका मोटारीवर आदळली. मोटारीतून बाहेर पडून दरोडेखोर पळू लागले असता माने यांनी उधलसिंग याला पकडले. त्याने त्यांच्या डोक्यात कटावणी मारली, तरीही त्यांनी त्याला सोडले नाही. सरतापे यांनी लगेच उधलसिंगला पकडले. इतर आरोपींच्या मागे पोलीस कर्मचारी पोळ, चिवटे इतर कर्मचारी गेले. पण ते दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. गुन्ह्य़ात वापरलेली तवेरा मोटार वाकड येथून चोरली आहे. या ठिकाणाहून सहा लाख रुपयांचे दागिने चोरीस गेले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jun 2013 रोजी प्रकाशित
शिवाजीनगरच्या सुमंगल अपार्टमेंटमध्ये दरोडा
शिवाजीनगरच्या मोदीबाग येथील सुमंगल अपार्टमेंटमध्ये रविवारी पहाटे तीनच्या सुमारास दोन सदनिकेत पाच ते सहा दरोडेखोरांनी दरोडा घातला.
First published on: 17-06-2013 at 02:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dacoity of 6 lacks in sumangal apert near shivajinagar