मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १२ हजार ६८४ विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अकरावी प्रवेशासाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी राबवली जाणार असून, ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

हेही वाचा- पुणे : चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब ; मनसेचे ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळली

सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्यासाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या आणि तीन विशेष फेऱ्या राबवण्यात आल्या. मात्र अद्यापही १२ हजार ६८४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळलेला नाही. त्यातील ११ हजार ४६२ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय मिळालेले नाही, तर १ हजार २२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. तसेच या पूर्वी घेण्यात आलेल्या फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांना एकाच महाविद्यालयाला प्रवेश ॲलॉट केला जातो. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार महाविद्यालय मिळाले नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्यासाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा- महाविकास आघाडीच्या वसुली कार्यक्रमामुळेच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला : राम कदमांची टीका

अर्ज केल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस

दैनंदिन गुणवत्ता फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकानुसार अर्ज केल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस मिळेल. त्या दिवसात प्रवेश न घेतल्यास त्या दिवसासाठी दिलेली पसंती रद्द समजून पुढील दिवसासाठी पुन्हा ऑनलाइन अर्ज करता येईल. या फेरीमध्ये विद्यार्थ्याने पसंती दर्शवलेल्या प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रतीक्षा यादीत त्याचे स्थान पाहता येईल. कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्त जागांनुसार तितके विद्यार्थी त्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या निवड यादीत समाविष्ट होतील. उर्वरित विद्यार्थी प्रतीक्षा यादीत राहतील. निवड यादीत असलेल्या विद्यार्थ्याला कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाला पसंती देऊन प्रवेशासाठी जाता येईल. या पद्धतीने ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तीन महिने होऊनही प्रवेश प्रक्रिया सुरूच….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर करून तीन महिने होऊन गेले तरी अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर करताना ही फेरी शेवटची असल्याचे आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबवली जाणार नसल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले होते. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीऐवजी दैनंदिन गुणवत्ता फेरी राबवली जात असल्याचे दिसून येत आहे.