पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत या महिन्यात १४ टक्के जास्त पाणीसाठा आहे. मात्र नियोजनाचा अभाव असल्याने शहरवासीयांना पाणी कपातीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. धरण १०० टक्के भरलेले असतानाही महापालिका प्रशासनाकडून नियमित पाणीपुरवठा केला जात नसल्याने शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पाण्याचा ८६.८७ टक्के इतका साठा होता. तरीही नागरिकांना दैनंदिन आणि वेळेत भरपूर पाणीपुरवठा केला जात होता. यावर्षी पावसाने नोव्हेंबर महिना संपला तरी अद्याप उघडीप दिलेली नाही. त्यामुळे धरणात पाण्याचा साठा शंभर टक्के इतका आहे. असे असतानाही शहरातील पाणीपुरवठय़ात आठवडय़ातून एक दिवस पाणी कपात केली जात आहे.

पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या नावाखाली ही पाणीकपात केली जात असली तरी शहरातील नागरिकांना अद्यापही सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शहराच्या काही भागात अद्यापही पाण्याचे टँकर सुरू आहेत. पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी फिरण्याची वेळ येत आहे.

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाणी वितरणात त्रुटी रहात असल्याने शहरातील विविध भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. या त्रुटींमुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील नागरिक  संताप व्यक्त करत आहेत.

गेल्यावर्षीच्या तुलनेत पवना धरणामध्ये पाण्याचा साठा या वेळी जास्त आहे. गेल्यावर्षी पाणीसाठा कमी असताना पाणीपुरवठा सुरळीत आणि पुरेशा प्रमाणात होत होता. प्रशासनाने योग्य नियोजन करुन पाणी कपात मागे घ्यावी आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा. धरणात शंभर टक्के पाणीसाठा असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन द्यावे. – सचिन चिखले, गटनेता, मनसे, पिंपरी चिंचवड महापालिका