अमली पदार्थ विक्रीच्या विरोधात मागील काही दिवसांमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये एक धक्कादायक वास्तव समोर येत असून, अमली पदार्थाच्या तस्करांकडून शहरातील महाविद्यालयांचा परिसर लक्ष्य केला जात आहे. बुधवारी एका तस्कराला पकडल्यानंतर त्यानेही अमली पदार्थाची विक्री शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना करीत असल्याची कबुली दिली आहे. चिमुटभर पावडर किंवा थेंबाच्या स्वरुपात मिळत असलेल्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थाचा बाजार शहरात फोफावत असताना पोलिसांनी आरोपींना पकडण्याबरोबरच अमली पदार्थाच्या दुष्परिणामांबाबत महाविद्यालयांमध्ये जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.
पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून करण्यात येणाऱ्या कारवायांमध्ये पूर्वी गांजा, चरस आदी पकडले जात होते. मात्र, अलीकडच्या काळामध्ये या अमली पदार्थामध्ये आंतरराष्ट्रीय अमली पदार्थाची भर पडल्याचे दिसते आहे. यामध्ये ‘मॅफ्रेडॉन’ हा अमली पदार्थ मोठय़ा प्रमाणावर शहरात येत असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले आहे. अमली पदार्थाच्या विश्वामध्ये ‘एमडी’ या लघू नावाने तो ओळखला जातो. पोलिसांच्या माहितीनुसार शहरात येणारा हा सर्वात महागडा अमली पदार्थ आहे. एका थेंबाला तब्बल सत्तावीसशे रुपये त्यासाठी तस्करांकडून आकारले जातात. ऑगस्ट महिन्यामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये १७४ ग्रॅम वजनाचा व पाच लाखांहून अधिक किंमत असणारा एमडी पकडण्यात आला होता.
‘एमडी’ नेमका कुठून आणला जातो किंवा त्या मागे कोणत्या आंतरराष्ट्रीय टोळीचा हात आहे, याची उत्तरे पोलिसांकडून शोधण्यात येत आहेत. मात्र, शहरात अमली पदार्थाची विक्री करणारी ही मंडळी केवळ उच्चभ्रू वस्त्याच नव्हे, तर शाळा व महाविद्यालयात परिसर व पर्यायाने तेथील विद्यार्थ्यांना लक्ष्य करीत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. बुधवारीही अमली पदार्थ विक्रेत्याला पकडण्यात आले. त्याच्याकडे गांजा मिश्रित तरंग नावाच्या गोळ्यांसह ‘एमडी’ही सापडले. पोलिसांनी त्याच्या अटकेची कारवाई केली असून, त्याचेही लक्ष्य शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थीच असल्याची कबुलीच त्याने दिली आहे. विशेष म्हणजे त्यालाही महाविद्यालयाच्या परिसरातच पकडण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थाचे व्यसन पसरविणाऱ्यांच्या विरोधात शहरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

अमली पदार्थाची माहिती द्या!
महाविद्यालयांच्या परिसरात अमली पदार्थाचा विळखा लक्षात घेता कारवाईबरोबरच पोलिसांनी अमली पदार्थाच्या दुष्परिणामांसह सायबर विषयक गुन्ह्य़ांच्या विषयावर शहरातील महाविद्यालयांमध्ये जनजागृतीची मोहीम सुरू केली आहे. त्याअंगर्तत पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या पुढाकाराने सिम्बायोसिस संस्थेच्या पाच महाविद्यालयांसह महावीर हॉस्टेल, व्हीआयआयटी, इंदिरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट आदी ठिकाणी शिबिराचे आयोजन करून विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम व त्याबाबतच्या कायद्यांची माहिती दिली. अमली पदार्थाबाबत काही माहिती मिळाल्यास ती पोलिसांना देण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.