इंदापूर : दौंड शहरातील नागरिकांनी वेळोवेळी झालेल्या निवडणुकांमध्ये नागरी हित संरक्षण समितीला निवडून दिले आहे. त्यामुळे या समितीची दौंड नगरपरिषदेवर सत्ता राहिली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे आमदार राहुल कुल यांनी समितीला पाठिंबा दिला होता. यावेळी भाजपकडून निवडणूक लढविली जाण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’चे आव्हान असणार आहे. त्यामुळे यंदा चौरंगी लढतीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दौंड नगरपरिषदेच्या निवडणुकीत नागरी हित संरक्षण समितीचे प्रेमसुख कटारिया हे नेहमीच केंद्रस्थानी राहिले. तालुक्यातील नेत्यांनी वेळोवेळी नगरपरिषदेच्या निवडणुकीत आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दौंड शहरवासीयांनी आतापर्यंत एकजूट कायम ठेवली आहे.

गेल्या निवडणुकीमध्ये तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने अन्य राजकीय पक्षांशी आघाडी करून १४ जागा जिंकल्या. मात्र, नागरी हित संरक्षण समितीच्या शीतल कटारिया या नगराध्यक्षपदी निवडून आल्या. दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांचा पाठिंबा नागरी हित संरक्षण समितीला होता. या निवडणुकीत दौंड नगरपरिषदेवर नागरी हित संरक्षण समिती पुन्हा सत्ता काबीज करणार की, अन्य पक्ष सत्तेवर येणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

आमदार राहुल कुल यावेळी स्वतंत्र पॅनेल उभे करणार की पुन्हा एकदा नागरी संरक्षण समितीला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. कुल यांना आपल्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व दौंड नगरपरिषदेमध्ये दाखवावे लागणार आहे. त्यासाठी राहुल कुल यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याचे दिसून येते.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला अस्तित्वासाठी धडपड करावी लागणार आहे.गेल्या निवडणुकीत २४ नगरसेवक होते. नवीन प्रभाग रचनेमध्ये एक प्रभाग वाढला असल्याने २६ नगरसेवक असणार आहेत. नगराध्यक्ष पद इतर मागासवर्ग महिलेसाठी आरक्षित, असून सर्वच राजकीय पक्षातून नगराध्यक्ष पदासाठी प्रभावी उमेदवाराचा शोध घेतला जात आहे.

प्रभाग संख्या- १३

सदस्य संख्या – २६

मतदार संख्या – ५०४८९

भाजपला धक्का, स्वप्निल शहा राष्ट्रवादी (अजित पवार गटात) दाखल या पार्श्वभूमीवर दौंड शहराच्या राजकारणात मोठे उलथापालथीचे वारे वाहू लागले आहेत. दौंड शहरातील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्वप्निल पोपटलाल शहा यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे.

स्वप्निल शहा हे शहरातील व्यापारी आघाडीशी घट्टपणे जोडलेले असून, त्यांनी दौंडमध्ये व्यापारी, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या सभोवती एक मजबूत संघटनात्मक कार्यकर्त्यांचा गट असल्याने, या प्रवेशामुळे राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला शहरात नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यासाठी संधी निर्माण झाल्याचे मानण्यात येते.