पुणे : पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने येथील वाहतुकीत अडथळे येत असून, अपघातांची संख्या वाढली आहे. तसेच, अवजड वाहनांमधून होणाऱ्या मालवाहतुकीवरही परिणाम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून दोन्ही महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या कोंडीमुळे प्रवासी वाहनांबरोबरच मालवाहतूक ठप्प होत असून, कृषी आणि उद्योगांवर मोठा परिणाम होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ‘पुणे-नाशिक मार्गावरील कोंडीमुळे उद्योगांवर परिणाम’ शीर्षकाखाली २८ जून रोजी प्रकाशित केले होते.

पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे, ‘पुणे-नाशिक महामार्ग हा औद्योगिक, व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या या मार्गावर अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वेळेचा, इंधनाचा फटका बसत असून, वाहतूक मंदावली आहे. वाहनचालकांबरोबर स्थानिक नागरिक, उद्योग व्यावसायिक, शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. याशिवाय, या महामार्गावर नियमितपणे टोल आकारला जात असतानाही रस्त्याच्या गुणवत्तेत व सुरक्षिततेबाबत कोणतीही सुधारणा झालेली नाही, हे दुर्दैवी आहे.’

तर ‘नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाट, इगतपुरी परिसरातील खराब रस्त्यांची अवस्था, खराब दर्जाचे वळण आणि पुलांचे अपूर्ण काम ही वाहतुकीस धोका निर्माण करणारी बाब आहे. तुमची कार्यक्षमता आणि पायाभूत विकासातील योगदान लक्षात घेता, दोन्ही महामार्गांची दुरुस्ती तातडीने पूर्ण होईल,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रात व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे-नाशिक महामार्ग क्रमांक ६० या मार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) डांबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून रुंदीकरण करण्यासाठी सुरुवात केली आहे. खेडपासून सिन्नरपर्यंत या रस्त्याचे काम सुरू असून, नाशिक फाटा ते राजगुरुनगर या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात निविदा प्रक्रिया राबवून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येईल. – संजय कदम, प्रकल्प संचालक, एनएचएआय