शिरुर : निमगाव म्हाळुंगी येथील कामिनी ओढ्यावरील रांजणगाव-निमगाव पुलावरून जात असताना तोल जाऊन पाण्यात पडलेल्या तरुणांचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळला. गेल्या दोन दिवसांपासून या युवकाच्या शोध घेण्यात येत होता. पुलापासून अर्धा किलोमीटर अंतरावर ओढ्यात मृतदेह आढळून आला.

सूरज अशोक राजगुरू (वय ३०) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. शिरूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सोमवारी निमगाव म्हाळुंगी गावातील कामिनी ओढ्यावरील पुलावरून जात असताना सुरजचा तोल जावून तो ओढ्यातील प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

आपत्ती मित्र पथक, स्थानिक नागरिकांनी युवकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला. पोलीस, पीएमआरडीएचे आपत्ती निवारण मदत पथक, अग्निशमन दल, दौलत शितोळे आणि त्यांचे सहकारी हे ओढ्याच्या पात्रात तरूणाचा शोध घेत होते. मंगळवारी अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते, असे तहसीलदार म्हस्के यांनी सांगितले. बुधवारी सकाळी सूरजचा मृतदेह सापडला.