महापालिका, वीज वितरण कंपनी, वाहतूक पोलीस आदी यंत्रणांमार्फत विविध कारणांसाठी उभारण्यात आलेले; पण आता वापरात नसलेले हजारो बिनकामाचे खांब शहरात उभे वा आडवे असून ते काढले जावेत यासाठी कोणतीही यंत्रणा प्रयत्न करत नसल्याचे चित्र आहे. शहरातील अशा हजारो ‘डेड पोल्स’मुळे रस्त्यांवरील जागा वाया जात आहे, शिवाय अशा खांबाचा अडथळा पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांनाही होत आहे.
शहरात महापालिकेतर्फे तसेच वीज वितरण कंपनीतर्फे खांब उभे केले जातात. त्यात पथदिव्यांच्या खांबांचा समावेश मोठय़ा प्रमाणात असतो. त्याबरोबरच चौकांमध्ये तसेच गर्दीच्या रस्त्यांवर वाहतूक नियंत्रक दिवे लावण्यासाठीही खांब उभे केले जातात. रस्त्यांवर वाहनचालकांना सूचना देण्यासाठी तसेच पार्किंगसंबंधीचे फलक लावण्यासाठी, देखील खांब उभे करावे लागतात. अशा प्रकारे हजारो खांब शहरात उभे आहेत. मात्र, त्यातील निरुपयोगी झालेले खांब देखील रस्तोरस्ती उभे वा आडवे आहेत.
रस्त्यावरील दिव्यांसाठी जे खांब उभारले जातात त्यांच्या संकल्पनेत नगरसेवक सातत्याने बदल करतात. त्यामुळे हे खांब दर दोन-तीन वर्षांनी महापालिका बदलते. मात्र, नवीन खांब उभारल्यानंतर जुने देखील जागेवरच ठेवले जातात. किंवा ते पाडले तर जिथे पाडले असतील, त्याच रस्त्याच्या कडेला आडवे टाकले जातात. सिग्नलचेही अनेक विनावापर खांब प्रमुख चौकांमध्ये पादचाऱ्यांना अडथळे करत उभे आहेत. तसेच ज्या खांबांवर पूर्वी पाटय़ा होत्या त्या आता काढून टाकण्यात आल्या आहेत तेही खांब जागेवरच आहेत.
शहरातील या बिनकामाच्या खांबांकडे नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी सर्वप्रथम महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. हे खांब काढले जावेत आणि रस्त्यातील अडथळे दूर व्हावेत यासाठी त्या गेली दीड वर्षे पाठपुरावाही करत आहेत. मात्र, अद्यापही त्यांना यश आलेले नाही. रस्त्यावरच्या जागेचा इंच न इंच आज महत्त्वाचा झालेला असताना अशाप्रकारे खांब रस्त्यात पाडून वा उभे ठेवणे योग्य नाही, ही बाबही सहस्रबुद्धे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. तरीही खांब हलवण्याबाबत सर्व स्तरावर उदासीनताच आहे. अनेक ठिकाणी या बिनकामाच्या खांबांचा आधार घेऊन अतिक्रमणेही होण्याची शक्यता असून काही ठिकाणी आडव्या खांबांच्या कडेने कचरा टाकण्याचेही प्रकार रस्तोरस्ती होत आहेत. सहस्रबुद्धे यांनी त्यांच्या प्रभागातील दोन मोठे रस्ते व सात छोटय़ा रस्त्यांवर केलेल्या सर्वेक्षणात १५५ डेड पोल्स आढळले होते.
निधी नाही; प्रश्न कायम
विनावापराचे खांब हलवावेत यासाठी पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेच्या कोणत्याही खात्याकडे त्यासाठी अंदाजपत्रकीय तरतूदच नसल्याचे मला सांगण्यात आले. म्हणून मी माझ्या प्रभागातील खांब हलवण्यासाठी वॉर्डस्तरीय तरतुदीमधून निधी देऊ का, अशी विचारणा केली, तर त्यालाही मंजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे खांब कोण आणि कोणत्या निधीतून हलवणार हा प्रश्न कायम आहे.
– माधुरी सहस्रबुद्धे
(नगरसेविका, प्रभाग क्रमांक ३६)