पुणे : डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेचा मौलिक ग्रंथठेव्याला आता तंत्रज्ञानाचा स्पर्श झाला आहे. संस्थेने विरासत या डिजिटल ग्रंथालय आणि मोबाइल उपयोजनाची निर्मिती केली असून, आता चारशे ते पाचशे वर्षे जुने ग्रंथ, हस्तलिखिते, पोथ्या यांचा समावेश असलेले २९ हजार ५५८ पुस्तके-साहित्य आता ऑनलाइन उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे अभ्यासक-संशोधकांना नवे दालन खुले झाले आहे.

हेही वाचा >>> शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवणुकीच्या बहाण्याने तीन घटनांमध्ये ९० लाखांचा ऑनलाइन गंडा

पुरातत्त्व, भाषाशास्त्र अशा विद्याशाखांमध्ये डेक्कन कॉलेज ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असलेली शिक्षण संस्था आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथ या संस्थेच्या ग्रंथालयात संग्रहित करून जतन करण्यात आले आहेत. राज्य सरकारने डेक्कन कॉलेजला दिलेल्या अनुदानाचा उपयोग करून ग्रंथठेव्याचे डिजिटलायझेशन करून संकेतस्थळ, उपयोजनाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी दिल्लीच्या व्हीआयआर सॉफ्टटेक, बिजिस कॉम्प्युटर्स या कंपन्याची मदत घेण्यात आली आहे. डेक्कन कॉलेजच्या नुकत्याच झालेल्या पदवी प्रदान कार्यक्रमात डेक्कन कॉलेजचे कुलगुरू प्रा. प्रमोद पांडे, आघारकर संशोधन संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत ढालेफालकर यांच्या उपस्थितीत ‘विरासत’ या डिजिटल ग्रंथालयाचे आणि उपयोजनाचे उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचा >>> कायमस्वरूपींना बोनस पण कंत्राटी मात्र वाऱ्यावर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रंथठेव्याच्या डिजिटलायझेशनमुळे भावी पिढ्यांसाठी हा ग्रंथठेवा सुरक्षित झाला आहे. तसेच समृद्ध इतिहासाचे संरक्षण करण्याबरोबरच संशोधनाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. हस्तलिखिते, पोथ्या, १५२३ ते १९६० च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले दुर्मिळ ग्रंथ, विद्यापीठाचे वार्षिक संशोधन बुलेटिन, विद्यापीठाची महत्वपूर्ण संशोधन प्रकाशने, वार्षिक अहवाल, पीएच.डी. प्रबंध, प्रबंधिका, विचारप्रक्रिया, नकाशे, चित्रफिती, टोपोशिट्स, मायक्रोफिल्म्स, मायक्रोफिश आणि यांसारखे बरेच काही संपन्न ग्रंथ साहित्य या संकेतस्थळ आणि उपयोजनावर उपलब्ध करण्यात आल्याची माहिती डेक्कन कॉलेजच्या ग्रंथपाल डॉ. तृप्ती मोरे यांनी दिली. https://virasat.dcpune.ac.in/jspui/ या दुव्याद्वारे डिजिटल ग्रंथालयाचा उपयोग करता येणार आहे. विद्यार्थी, अभ्यासक, सर्वसामान्यांना वापर करणे शक्य डिजिटल ग्रंथालय, उपयोजनाचा वापर संस्थेतील विद्यार्थ्यांसह संस्थेबाहेरील अभ्यासक-संशोधक, सर्वसामान्य वाचकांनाही वापर करता येणार आहे. त्यासाठी संस्थेच्या विद्यार्थ्यांना वेगळे शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, संस्थेबाहेरील अभ्यासक-संशोधक, सर्वसामान्य वाचकांना संकेतस्थळावर नोंदणी करून शुल्क भरावे लागणार आहे. शुल्क भरण्याच्या सुविधेची तांत्रिक प्रक्रिया सुरू असल्याचेही डॉ. मोरे यांनी सांगितले.