लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेने कराटेमध्ये अनोखा विश्वविक्रम करत इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. तीन मिनिटांत सर्वाधिक पंच मारण्याचा हा विक्रम असून, शाळेच्या १२९६ विद्यार्थ्यांनी मिळून तीन मिनिटांत २ लाख ९० हजार ३०४ पंच मारले.

आयडियल तायक्वांदो कराटे, किक बॉक्सिंग असोसिएशन, नवीन मराठी शाळा यांच्यातर्फे गुरुवारी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे परीक्षक शाकीर शेख यांनी उपक्रमाचे परीक्षण करून विश्वविक्रम झाल्याचे जाहीर केले. आयडियल तायक्वांदो, कराटे किक बॉक्सिंगचे अध्यक्ष संजय सोनवणे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी राजेंद्र जोग, ॲड. राजश्री ठकार, नवीन मराठी शाळेचे तायक्वांदो व कराटे प्रशिक्षक दिनेश भुजबळ, मुख्याध्यापिका कल्पना वाघ, ज्येष्ठ शिक्षक तनुजा तिकोने, भाग्यश्री हजारे, अर्चना देव, योगिता भावकर, धनंजय तळपे या वेळी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्वविक्रमाच्या प्रयत्नात प्रत्येक विद्यार्थ्यांनी एका मिनिटात ७५ पंच, तर तीन मिनिटांत २२४ पंच मारले. १२९६ विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत न थकता या उपक्रमात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, शैक्षणिक, बौद्धिक विकास होऊन स्वसंरक्षणाबद्दल जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी सांगितले.