श्वान परवान्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता मांजर पाळण्यासाठी परवाना घेणे शहरवासीयांसाठी बंधनकारक केले आहे. नवीन परवान्यासाठी ७५ रूपये शुल्क राहणार असून, नूतनीकरणासाठी ५० रूपये मोजावे लागणार आहे. परवाना घेतल्याशिवाय मांजर पाळल्यास कारवाई करण्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे.
हेही वाचा >>>पुणे: आठ वर्षांच्या मुलीसोबत लैंगिक चाळे करणारा अटकेत
पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रशासकीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी श्वान पाळण्यासाठी ७५ रूपये व नूतनीकरणासाठी ५० रूपये शुल्क पालिकेने निश्चित केले होते. पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने हा परवाना दिला जातो. त्याचपध्दतीने मांजर पाळण्यासाठी परवाना आवश्यक करण्यात आला असून त्यासाठी श्वान परवान्याप्रमाणेच शुल्क आकारले जाणार आहे.
हेही वाचा >>>पुणे: पाच लाखांच्या कर्जावर दररोज १५ हजारांचा दंड; खंडणी विरोधी पथकाकडून सावकारावर कारवाई
या परवान्याची मुदत एक वर्षांची असणार आहे. त्याचे नूतनीकरण प्रत्येक वर्षी करावे लागणार आहे. मांजराला रेबीज लसीकरण बंधनकारक असणार आहे. मांजरापासून इतरांना त्रास होणार नाही, याची दक्षता परवानाधारकाने घेतली पाहिजे. मांजरापासून स्वच्छतेच्या किंवा अन्य तक्रारी आल्यास परवाना रद्द करण्याचे अधिकार पालिकेला राहतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.