पुणे : नवले पुलाजवळ सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी आणि महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. तीनपेक्षा जास्त वेळा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्यात येणार असून, त्यानंतरही उल्लंघन होत राहिल्यास वाहनजप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी याबाबत आदेश दिला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या अपघाताची चौकशी करून मार्गावर आवश्यक त्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या सूचनाही डाॅ. पुलकुंडवार यांनी केल्या आहेत.
नवले पूल परिसरात गेल्या गुरुवारी झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर शहर आणि परिसरातील वाहतूक सुधारणांबाबत विधानभवन येथे सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे, पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते. तसेच, ‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष तिवारी यांनी दृक् श्राव्य प्रणालीद्वारे चर्चेत सहभाग घेतला.
कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान होणाऱ्या अपघातांची कारणे शोधून उपाययोजनांबाबतचा अहवाल ‘सेव्ह लाइफ’ने तीन-चार वर्षांपूर्वी केला होता. त्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या गंभीर अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सविस्तर अभ्यास करावा, अशी सूचना डाॅ. पुलकुंडवार यांनी केली. त्या अनुषंगाने दोन आठवड्यांत अभ्यास करून अहवाल सादर केला जाणार आहे.
‘शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई करण्याचा आदेशही देण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाला दंड करण्याचे आणि तीनपेक्षा जास्त वेळा नियमांचे उल्लंघन झाल्यास वाहन परवाना निलंबित करण्यात येणार आहे. त्यानंतरही उल्लंघन होत राहिल्यास वाहन जप्तीची कारवाई केली जाईल,’ असे डाॅ. पुलकुंडवार यांनी स्पष्ट केले.
अतिरिक्त मनुष्यबळासाठी पाठपुरावा
शहर वाहतूक शाखेने अतिरिक्त मनुष्यबळाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्या संदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. हा प्रस्ताव मान्य होईपर्यंत वाहतूक शाखेच्या मागणीनुसार संबंधित रस्त्याची मालकी असलेल्या यंत्रणेकडून वाहतूक नियमनासाठी ट्रॅफिक वाॅर्डन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तशी सूचनाही या बैठकीत करण्यात आली.
बैठकीतील ठळक मुद्दे
– वाहतूक नियमनासाठी महापालिकेकडून ट्रॅफिक वाॅर्डन
– अपघातप्रवण क्षेत्रामध्ये तातडीने उपाययोजना
– वाहतुकीच्या नियमनासाठी एकात्मिक नियंत्रण केंद्र
– रस्ते सुरक्षा समितीची दरमहा बैठक
– बैठकीतील उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी
– रस्ता सुस्थितीत नसल्यास संबंधित यंत्रणांवर कारवाई
– आवश्यक त्या ठिकाणी रॅम्बलर स्ट्रिप, वाहतूक चिन्हे, फलक, बॅरिअरची उभारणी
– रस्त्याच्या आराखड्यामधील त्रुटींंमध्ये सुधारणा
