|| विद्याधर कुलकर्णी
पुणे : इंग्रजी भाषेचे प्रभुत्व वाढत असताना एकमेकांशी संवादाच्या दृष्टीने हिंदूी भाषेचे महत्त्व अबाधित आहे. मात्र, हिंदूी भाषा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. पूर्वी या परीक्षांना शहरातील विविध शाळांमधील एकूण विद्यार्थ्यांपैकी ७५ टक्के विद्यार्थी बसत असत. आता ही संख्या ५५ टक्क्यांपर्यंत आली आहे, ही बाब मंगळवारी (१४ सप्टेंबर) हिंदूी राष्ट्रभाषा दिवस साजरा होत असताना समोर आली आहे.

हिंदूी राष्ट्रभाषा दिवस मंगळवारी साजरा होत असताना महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीचे ज. गं. फगरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना हिंदीच्या सद्य:स्थितीवर प्रकाश टाकला.

फगरे म्हणाले, विविध इयत्तांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हिंदूी भाषेच्या सुलेखन, प्राथमिक, प्रवेश, परिचय, कोविद रत्न आणि आचार्य अशा परीक्षा घेतल्या जातात. सप्टेंबर आणि फेब्रुवारी अशा वर्षांतून दोनदा परीक्षा घेतल्या जातात. शिक्षणाचा भाग म्हणून शिक्षक हिंदीच्या परीक्षांची अतिरिक्त काम म्हणून नोंद करतात. या परीक्षा अजूनही होतात. पण, पूर्वीइतक्या संख्येने विद्यार्थी त्यांना बसतातच असे नाही. पूर्वी या परीक्षांना शहरातील विविध शाळांतील एकूण विद्यार्थी संख्येच्या ७५ टक्के विद्यार्थी बसत असत. हे प्रमाण आता जवळपास ५५ टक्क्यांपर्यंत आले आहे. हिंदूीचे महत्त्व कमी झालेले नाही. परंतु, हिंदूी भाषेच्या परीक्षांचे महत्त्व थोडेसे कमी झाले आहे, असे म्हणता येईल, अशी परिस्थिती नक्कीच झाली आहे.

कोणीही माणूस कोणत्याही प्रदेशात गेला तरी त्याला संवादासाठी हिंदूीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हिंदूीचे महत्त्व अबाधित आहे. इंग्रजीचा प्रभाव वाढला आहे. इंग्रजी भाषा नोकरीसाठी उपयुक्त असा समज झाला आहे. पण, हिंदूीच्या ज्ञानाशिवाय त्यांना कोणत्याही क्षेत्रात काम करता येत नाही. नोकरीच्या ठिकाणी सर्व भाषक लोक असल्याने बोलताना हिंदूीचा वापर करावा लागतो, याकडे फगरे यांनी लक्ष वेधले.

राष्ट्रभाषा दिवसाचा इतिहास

कोणत्याही देशाची ओळख ही त्याची राष्ट्रभाषा, राष्ट्रध्वज आणि त्या देशाच्या संस्कृतीवरून होत असते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर घटना समितीने १४ सप्टेंबर १९५० रोजी हिंदूी भाषेला राष्ट्रभाषा आणि देवनागरी लिपीला राष्ट्र लिपी म्हणून घोषित केले. तेव्हापासून १४ सप्टेंबर हा हिंदी राष्ट्रभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदूी सर्वाना समजते आणि देशाला एका सूत्रात बांधण्याचे सामर्थ्य हिंदीमध्ये आहे. महात्मा गांधी यांनी हिंदूीमध्ये राष्ट्रीयता असल्याची ग्वाही देत तिच्या प्रचारासाठी प्रयत्न केले होते. परराष्ट्रमंत्री असताना अटलबिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये हिंदीतून भाषण करून राष्ट्रभाषेचा गौरव केला होता.