महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निरोपानुसार माजी आमदार आणि पक्षाचे सरचिटणीस दीपक पायगुडे गुरुवारी पक्षाच्या बैठकीत उपस्थित होते. पक्षकार्यात सक्रिय होण्याचे त्यांनी मान्य केल्याची चर्चा असून पायगुडे पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी सक्रिय झाल्याचेही सांगितले जात आहे.
मनसेतर्फे दुष्काळी भागात विविध कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामांच्या पाहणीसाठीचा दौरा राज ठाकरे यांनी गुरुवारपासून सुरू केला. दौऱ्याला प्रारंभ करण्यापूर्वी ठाकरे पुण्यात आले होते. पुण्यात आल्यानंतर त्यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पुण्यातील सर्व नगरसेवकांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळी कामांसाठी दिले असून तो निधी या वेळी राज ठाकरे यांना देण्यात आला. या दौऱ्याला निघण्यापूर्वी राज यांनी दीपक पायगुडे यांनाही भेटीसाठी बोलावले होते. त्यानुसार त्यांनी राज यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सर्व नगरसेवकांबरोबरही त्यांच्या गप्पा झाल्या. राज यांच्या दौऱ्यात दोनतीन दिवसांनी सहभागी होण्याचे त्यांनी या वेळी मान्य केले.
पायगुडे यांनी दोनवेळा भवानी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विधानसभेत केले असून सन २००९ ची लोकसभा निवडणूक त्यांनी पुण्यातून लढवावी, असा राज आणि तत्कालीन सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. ताज्या घडामोडी पाहता पायगुडे आता सक्रिय होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी लोकसभा ते पुण्यातून मनसेतर्फे लढवतील अशी चर्चा सुरू झाली आहे.