पुणे : संरक्षण क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन संरक्षण प्रगत संशोधन संस्थेने (डाएट) सेमीकंडक्टर चीप डिझाइन, संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञान या विषयांवरील पदव्युत्तर पदवी (एम. टेक) अभ्यासक्रम सुरू केले आहेत. संरक्षण क्षेत्राच्या तांत्रिक गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. संरक्षण आणि अवकाश इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमात प्रामुख्याने उपग्रहविरहित संवादप्रणालीवर भर असून, पहिल्यांदाच असा अभ्यासक्रम भारतात सुरू होत आहे.

डाएटचे कुलगुरू डॉ. बीएचव्हीएस नारायण मूर्ती ही माहिती दिली. प्रा. के. बालसुब्रमण्यम, प्रा. संगीता काळे, प्रा. मनीषा नेने, प्रा. जी. राघवन या वेळी उपस्थित होते. डाएटचा पदवी प्रदान समारंभ ९ ऑगस्ट रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) प्रमुख डॉ. समीर कामत यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात एमटेक, एमएस्सी, पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदवी, पदके प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच या निमित्ताने दोन प्रयोगशाळांचे उद्घाटनही करण्यात येणार आहे.

डॉ. मूर्ती म्हणाले, की आताच्या तंत्रज्ञानाच्या काळात युद्धाचे स्वरूप बदलत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मधून ते दिसून आले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाधारित युद्धाचे भविष्य लक्षात घेता त्यात ‘डाएट’ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठ म्हणून जागतिक पातळीवरील संस्थांचे अभ्यासक्रम, संरक्षण क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान विकसनावर भर देण्यात येत आहे. त्या दृष्टीने सेमीकंडक्टर तंत्रज्ञान, संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञान या विषयांतील पदव्युत्तर पदवी (एमटेक) अभ्यासक्रम यंदापासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी वीस जागा उपलब्ध आहेत. जागतिक पातळीवरील अभ्यासक्रमांचा आढावा घेऊन उद्योग क्षेत्राच्या सहकार्याने अभ्यासक्रम विकसित करण्यात आले आहेत. त्याशिवाय परदेशी विद्यापीठांशी असलेल्या सहकार्यातून दुहेरी पदवी अभ्यासक्रम (ड्युएल डिग्री) सुरू करण्यात येणार आहे.

‘सायबर कमांडो’च्या पुढील तुकड्यांचे प्रशिक्षण

गेल्या वर्षी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या सायबर कमांडोच्या एका तुकडीचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण गेल्या वर्षी ‘डाएट’मध्ये झाले. पुढील दोन तुकड्यांचे प्रशिक्षण महिनाअखेरीस सुरू होणार आहे. नव्याने समोर येणाऱ्या सायबर आव्हानांचा समावेश या प्रशिक्षणात केला जात असल्याची माहिती प्रा. मनीषा नेने यांनी दिली.

ड्रोन तंत्रज्ञानासाठी प्रारूप

डाएटमधील प्राध्यापकांचा गट डीआरडीओमधील शास्त्रज्ञांसह ड्रोन तंत्रज्ञानासाठी मशिन लर्निंगचे प्रारूप विकसित करत आहे. ड्रोन प्रणाली वेगवेगळ्या हवामानाच्या परिस्थितीत, तसेच सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे प्रारूप विकसित करण्यात येत आहे, असे डॉ. मूर्ती यांनी सांगितले.