Defense Secretary Rajesh Kumar Singh Pune: ‘पुण्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) प्रयोगशाळा आहेत. खासगी क्षेत्रातील लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांपासून (एमएसएमई) मोठ्या उद्योगांपर्यंत अत्यंत सक्षम संरक्षण उत्पादन क्षेत्र आहे. त्यामुळे पुणे हे संरक्षण क्षेत्रासाठी देशातील सर्वांत महत्त्वाचे ठिकाण आहे,’ असे मत संरक्षण विभागाचे सचिव राजेशकुमार सिंह यांनी शुक्रवारी मांडले.

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे आयोजित ‘स्टाइड’ (सिनर्जी ऑफ टेक्नॉलॉजी, रीसर्च, इंडस्ट्री अँड डिफेन्स इकोसिस्टीम) या कार्यक्रमासाठी सिंह पुण्यात आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी पुण्याचे संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे स्थान अधोरेखित केले.

‘लष्कराचे दक्षिण मुख्यालय, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि अनेक संरक्षण संस्था पुण्यात आहेत. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सने १२०० संरक्षण उत्पादकांची यादी तयार केली आहे. पुण्यातील संरक्षण उत्पादक कंपन्यांमध्ये चार वर्षांत मोठी वाढ झाली आहे. फायटर जेट इंजिनासंदर्भात आंतरराष्ट्रीय इंजिन उत्पादकांसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्यातून १०० टक्के उत्पादनाचे हक्क (आयपीआर) भारताला हस्तांतरित करण्याची अट आहे. हा दशकभराचा दीर्घकालीन उपक्रम आहे. नौदलासाठी सागरी इंजिन विकसित करण्याचे काम पुण्यातील किर्लोस्कर कंपनीला देण्यात आले आहे. एकूणच संरक्षण क्षेत्रातील स्वदेशीकरण आणि सार्वजनिक-खासगी क्षेत्रातील समन्वय वाढविण्याच्या दिशेने सरकार निर्णायक पावले टाकत आहे. त्यात पुणे हे देशाचे प्रमुख संरक्षण केंद्र ठरत आहे,’ असे सिंह यांनी सांगितले.

‘डीआरडीओ’कडून डीपीआर

‘भारताकडे आधीच बहुपर्यायी हवाई संरक्षण व्यवस्था आहे. ही व्यवस्था ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान प्रभावी ठरली. मात्र, भारताचा भूप्रदेश विशाल असल्याने पायाभूत सुविधा, लोकसंख्या आणि औद्योगिक केंद्रांना अधिक सक्षम संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सुदर्शन चक्र’ मोहिमेची घोषणा केली आहे. या अंतर्गत नवीन शस्त्रसज्जता खरेदीसह सध्याच्या यंत्रणेचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल डीआरडीओ तयार करीत आहे,’ असे राजेशकुमार सिंह यांनी स्पष्ट केले.