करोना लसीकरण मोहिमेत देशभरातील नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रामुख्याने वापरण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड लशीला वर्धक मात्रा लसीकरणामुळे पुन्हा मागणी वाढत आहे, मात्र अद्याप पुणे महापालिकेच्या रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांवरही कोव्हिशिल्ड लशीची प्रतीक्षाच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना वर्धक मात्रा घेण्याची इच्छा असूनही कोव्हिशिल्डच्या उपलब्धतेसाठी ताटकळावे लागत आहे.
नुकताच चीनसह जगातील काही देशांमध्ये करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या प्रकाराचा बीएफ.७ हा उपप्रकार मोठ्या प्रमाणात संसर्गाला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे सर्वच स्तरावर वर्धक मात्रेसह लसीकरण पूर्ण करणे; तसेच प्रतिबंधात्मक उपायांच्या अंमलबजावणीचा आग्रह धरण्यात येत आहे. परदेश प्रवासासाठीही वर्धक मात्रा लसीकरणाचे प्रमाणपत्र मागितले जात असल्याने इच्छुकांकडून विशेषत: परदेशी विद्यापीठात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्धक मात्रेसाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>>पुणे: महापालिकेची रुग्णालये सज्ज; शहरातील करोना रुग्णसंख्या नियंत्रणात

मनोहर देशपांडे (६८ वर्षे) म्हणाले, मला रक्तदाब, मधुमेह अशा व्याधी आहेत. नुकतेच डॉक्टरांनी करोना लशीची वर्धक मात्रा घेण्यास सांगितले आहे, मात्र पहिल्या दोन मात्रा कोव्हिशिल्ड लशीच्या घेतल्या आहेत. ती लस सध्या उपलब्ध नसल्याने ती उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करत आहे.
मुग्धा पाटील ही विद्यार्थिनी म्हणाली, अमेरिकेतील विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी जाण्याची तयारी करत आहे. परदेश प्रवासासाठी करोना लशीची वर्धक मात्रा घेणे सक्तीचे आहे. पूर्वी घेतलेल्याच लशीची मात्रा घेणे आवश्यक आहे, मात्र सध्या महापालिका रुग्णालयांमध्ये कोव्हिशिल्ड उपलब्ध नाही. खासगी रुग्णालयांमध्ये पैसे खर्च करून घेण्यासाठीही ही लस नाही, त्यामुळे लशीच्या प्रतीक्षेत आहे.

हेही वाचा >>>पुणे: पर्वती, पद्मावती भागातील ग्राहकांना सदोष वीजदेयके; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची कबुली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याकडून पुरवठ्याची प्रतीक्षा
महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, केंद्र सरकारडून राज्य सरकारला लशींचा पुरवठा झाला की राज्य सरकार महापालिकांना लस पुरवठा करते. सध्या बीएफ.७ च्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांकडून वर्धक मात्रेसाठी विचारणा होत आहे. मात्र, पुणे महापालिकेला कोव्हिशिल्डचा पुरवठा अद्याप झालेला नसल्याने आम्हालाही नागरिकांना निश्चित माहिती देता येत नाही. कोव्हॅक्सिनचा साठा महापालिकेकडे पुरेसा आहे. त्यामुळे ज्यांनी पूर्वी कोव्हॅक्सिनच्या दोन मात्रा घेतल्या आहेत, त्यांनी वर्धक मात्रेसाठी यावे, असे आवाहनही डॉ. देवकर यांनी केले.