नक्षलवादी संघटनेचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडेच्या नावाने माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्याकडे वीस लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी नक्षलवादी  अरुण भेलके याच्याशी संपर्कात असल्यावरून या तरुणाची चौकशी झाली होती.
शाहरूख चाँद खान (वय २१, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रमेश बागवे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शाहरूख हा बागवे यांना भेटण्याचा प्रयत्न करीत होता. २४ फेब्रुवारी रोजी शाहरूख हा बागवे यांना भवानी पेठेतील वैद्य स्टेडियम व्यायाम शाळा येथे भेटला. त्या वेळी बागवे यांना तो म्हणाला, की ‘पुणे शहरातील अत्यंत महत्त्वाच्या चाळीस व्यक्तींची आम्ही यादी तयार केली आहे. या चाळीस लोकांवर नजीकच्या काळात हल्ला करून ठार मारण्याचा कट झाला आहे. आपला देखील यात देखील यामध्ये चाळिसावा क्रमांक आहे. सुरक्षित राहायचे असल्यास वीस लाख रुपये द्यावे लागतील. मला तेलतुंबडे साहेबांनी तुमच्याकडे पाठविले आहे,’ अशी धमकी दिली. बागवे यांनी तत्काळ पोलीस आयुक्तांची भेट घेऊन घटनेची माहिती दिली. बागवे यांना आरोपीने धमकी दिल्याचे सीसीटीव्हीत चित्रीकरणात कैद झाले आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी गुन्हा दाखल करून शहारूख याला अटक केली आहे.
शाहरूख हा कासेवाडी भागात मास मूव्हमेन्ट संघटनेचा कार्यकर्ता आहे. पुणे परिसरात नक्षलवादी अरुण भेलके व त्याच्या पत्नीला दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती. त्या वेळी शाहरूख हा भेलकेशी संपर्कात असल्यामुळे त्याची देखील चौकशी झाली होती. आता शाहरूख हा नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याच्या नावाने धमकावून खंडणीची मागणी करीत असल्याचे समोर आले आहे. शाहरूख याला खडक पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, या घटनेनंतर बागवे यांनी पोलीस संरक्षणाची पोलिसांकडे मागणी केली आहे.