पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नियोजित प्रकल्प कागदावरच राहिल्याने मान्सूनपूर्व पावसातच आयटी पार्कमधील वाहतूक समस्या बिकट बनली आहे. दररोज संध्याकाळी काही किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता या पावसाळ्यात माहिती तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरून काम करण्याची सक्ती सरकारने करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
गेल्या काही वर्षांत आयटी पार्कमधील कंपन्यांची आणि पर्यायाने वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. याच वेळी रस्त्यांचे रुंदीकरण आणि पर्यायी मार्ग तयार करण्याकडे दुर्लक्ष झाले. वाहतूक कोंडीच्या समस्येवर वारंवार आरडाओरडा होऊ लागल्याने अखेर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आयटी पार्कमधील उड्डाणपुलासह पर्यायी रस्त्यांच्या ६५० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे नियोजन केले. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून नियोजनापलीकडे या प्रकल्पांवर काम झालेले नाही. ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पांसाठीच्या भूसंपादनाचा प्रस्ताव तयार करून मुख्यालयाला पाठविला आहे. त्यावरही अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
आयटी पार्कमधील प्रलंबित प्रकल्प
१. लक्ष्मी चौकातील उड्डाणपूल
लांबी : ७२० मीटर
खर्च : ४० कोटी रुपये
२. शिवाजी चौक ते स्मशानभूमी सहापदरी रस्ता
लांबी : ९०० मीटर
खर्च : २४.७४ कोटी रुपये
३. आयटी पार्क टप्पा १ ते टप्पा ३ रस्ता
लांबी : ५ किलोमीटर
खर्च : ५८४.१४ कोटी रुपये
आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. वर्षानुवर्षे आपण तेच मुद्दे मांडत आहोत. परंतु, कोणालाही त्याचे काहीच पडलेले नाही. आधीच आयटी क्षेत्रात प्रचंड बदल होत आहेत, नोकऱ्या धोक्यात आहेत, नवीन नोकऱ्या मिळणे अवघड बनले आहे. त्यात वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांचा शारीरिक आणि मानसिक त्रास वाढत आहे. त्यामुळे पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी.- ज्ञानेंद्र हुलसुरे, हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडंट्स ट्रस्ट (हार्ट)
आयटी पार्कमध्ये पुरेशा पायाभूत सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. पावसाळ्यात वाहतूक नियमनासह सांडपाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सरकारनेच कंपन्यांवर आता ‘वर्क फ्रॉम होम’ची सक्ती करावी. कर्मचारी कार्यालयातून घरी परतताना दररोज दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत अडकत आहेत. यातून केवळ कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेवरच नव्हे, तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.- पवनजीत माने, अध्यक्ष, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज महाराष्ट्र
हिंजवडीतील आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ता रुंदीकरणासह पर्यायी मार्गांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांचे भूसंपादन ‘एमआयडीसी’कडून केले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव ‘एमआयडीसी’च्या मुख्यालयाला पाठविण्यात आला आहे. अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.- अर्चना पठारे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी
हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी आयटी पार्ककडे जाणाऱ्या ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील रस्ते दुरुस्तीची कामे गेल्या वर्षामध्ये सातत्याने करण्यात आली आहेत. ‘एमआयडीसी’कडील काही कामे शिल्लक आहेत, ती काही दिवसांत पूर्ण होतील. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था होण्याची शक्यता आहे. रस्ते दुरुस्तीची जबाबदारी मेट्रोचे काम करणाऱ्या संबंधित कंपनीची आहे. त्या दृष्टीने त्यांना तातडीने कामे करण्याची सूचना केली जाईल. मात्र, त्यांनी ती न केल्यास ‘पीएमआरडीए’कडून स्वतंत्र ठेकेदाराच्या मार्फत कामे तातडीने केली जातील.- डाॅ. योगेश म्हसे महानगर आयुक्त, पीएमआरडीए