५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांमध्ये असलेली एक कोटी १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड पुणे पोलीस आणि प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपण केलेल्या कारवाईत शुक्रवारी सकाळी पुण्यातील लष्कर परिसरामधून जप्त करण्यात आली. या प्रकरणी एका व्यक्तीची प्राप्तिकर विभागाकडून सध्या चौकशी सुरू आहे. २५ टक्के कमिशनवर या जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देण्यात येणार होत्या. त्यासाठी संबंधित व्यक्ती घटनास्थळी आली होती. भरत राजमल शहा असे चौकशी सुरू असलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत राजमल शहा यांच्या ताब्यातील एक कोटी १२ लाख ५० हजारांची रोकड बदलून देण्याचे आश्वासन एकाने दिले होते. त्यासाठी रोकड घेऊन शहा यांना लष्कर परिसरातील कॅनेरा बॅंकेजवळ बोलावण्यात आले होते. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी एक व्यक्ती या परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर तिथे सापळा रचण्यात आला होता. एका कापडी पिशवीतून ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा शहा हे घेऊन घटनास्थळी आले होते. पोलिसांनी या संदर्भात प्राप्तिकर विभागाचे पुण्यातील अधिकारी के. के. मिश्रा यांना माहिती दिली होती. रोकड घेऊन आलेल्या भरत राजमल शहा याला पोलिसांनी आणि प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पकडले. त्याच्याकडून संबंधित रक्कम जप्त करण्यात आली आहे.

प्राप्तिकर विभागाचे अधिकारी भरत राजमल शहा याला प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात घेऊन गेले असून, ही रक्कम कोणाची आहे. ती कुठून आली आहे, याची चौकशी करण्यात येते आहे. २५ टक्के कमिशनवर ही रोकड बदलून देण्याचे आश्वासन भरत राजमल शहा यांना देण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापे मारून बेनामी रोकड जप्त केली आहे. महाराष्ट्रातही अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणातील जुन्या चलनातील रोकड जप्त करण्याचे प्रकार समोर आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demonetization effects rs one crore old notes seized from a person in pune
First published on: 25-11-2016 at 14:30 IST